Join us

​महाराष्ट्रातही ‘पद्मावती’ला विरोध ; भाजपा आमदाराने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 10:15 AM

राजस्थान, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ‘पद्मावती’चा वाद रंगणार, अशी चिन्हे दिसू लागली आहे. भाजपाचे आमदार सुजीत सिंग ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना ...

राजस्थान, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ‘पद्मावती’चा वाद रंगणार, अशी चिन्हे दिसू लागली आहे. भाजपाचे आमदार सुजीत सिंग ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्रात ‘पद्मावती’च्या प्रदर्शनावर बंदी घाला, अशी मागणी केली आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटात इतिहासाची छेडछाड करण्यात आली आहे. अनेक भाजपा मंत्र्यांनी व राज्यांच्या आमदारांनी ‘पद्मावती’ला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात यावे, असे ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. यापूर्वी महाराष्ट्राचे मंत्री जयकुमार रावल यांनी ‘पद्मावती’वर बंदी लादण्याची मागणी केली होती. चित्रपटात राजपूत समाजाच्या भावनांशी छेडछाड केली गेली आहे. यामुळे अराजकता पसरण्याचा धोका आहे, असे रावल म्हणाले होते.करणी सेना आणि राजपूत संघटनांनी सुरुवातीपासूनचं चित्रपटाच्या रिलीजला विरोध चालवला आहे.  काही राजकीय पक्षांनी या चित्रपटाच्या विरोधात सूर आवळला आहे.  अलीकडे हा वाद सर्वोच्च न्यायालयाही पोहोचला होता. अर्थात सुप्रीम कोर्टाने  भन्साळींना दिलासा  देत ‘पद्मावती’च्या रिलीजवर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली होती.  ‘पद्मावती’ रिलीज व्हावा की नाही, याचा निर्णय सेन्सॉर बोर्ड घेईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. याचदरम्यान रिलीजच्या तोंडावर वाद असा चिघळत असलेला  पाहून  ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना आपले मौन तोडावे लागले होते. चित्रपटात राणी पद्मावती आणि अलाऊद्दीन खिल्जी यांच्यावर कुठलाही ड्रीम सीक्वेंस नाही, असा पुनरूच्चार त्यांनी केला होता.ALSO READ: भाजपाची ‘पद्मावती’वर बंदीची मागणी; जाणून घ्या काय आहे कारण!अगदी अलीकडे  जय राजपुताना संघ या राजपूत गटाने ‘पद्मावती’च्या मेकर्सला जाहिर धमकी दिली होती. रिलीज आधी ‘पद्मावती’ आम्हाला दाखवला गेला नाही आणि आमच्या संमतीविना तो रिलीज झालाच आणि त्यात काही आक्षेपार्ह आढळलेच तर चित्रपटगृहे पेटवून देऊ, असे जय राजपुताना संघाने म्हटले होते.त्याआधीशूटींगच्या अगदी पहिल्या टप्प्यात करणी सेनेने ‘पद्मावती’च्या सेटवर धिंगाणा घातला होता. ‘पद्मावती’त राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आक्षेप घेत गत जानेवारीच्या अखेरिस करणी सेनेने राजस्थानच्या जयपूर नजिक जयगढ येथे ‘पद्मावती’च्या सेटवर हल्ला केला होता. यादरम्यान ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मारहाणही करण्यात आली होती. यानंतर ‘पद्मावती’चा सेट कोल्हापुरात हलवण्यात आला होता. पण  काही अज्ञात व्यक्तिंनी या सेटचीही तोडफोड करत त्याल आग लावण्याचा प्रयत्न केला होता.