राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘विलेज रॉकस्टार्स’ या आसामी चित्रपटाची प्रतिष्ठेचा समजल्या जाणा-या ‘आॅस्कर2019’साठी भारताकडून निवड करण्यात आली आहे. ‘पद्मावत’, ‘राजी’, ‘पीहू’, ‘कडवी हवा’ आणि ‘न्यूड’ यांसारख्या चित्रपटांना मागे टाकत ‘विलेज रॉकस्टार्स’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. ‘आॅस्कर’ पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून या चित्रपटाची निवड झाली. रिमा दास दिग्दर्शित या आसामी चित्रपटान ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला होता. अनेक चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे कौतुक झाले आहे. कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट भारताकडून आॅस्करसाठी पाठवण्याची घोषणा झाली आणि या चित्रपटाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे आज प्रत्येकजण या चित्रपटाबद्दल जाणू इच्छितो. याच उत्सुकतेपोटी ‘विलेज रॉकस्टार्स’बदद्लच्या खास सहा गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
‘विलेज रॉकस्टार्स’ हा चित्रपट एका १० वर्षांच्या धुनु नामक मुलीची कथा आहे. स्वत:चे गिटार खरेदी करण्याचे तिचे स्वप्न असते़ आपल्या आजुबाजूच्या मुलांना एकत्र करून ती ‘द रॉकस्टार्स’ नावाचा म्युझिक बँड बनवू इच्छिते. भनिता दास आणि बसंती दास यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.
छोट्या बजेटच्या या चित्रपटाला डिजिटल कॅमेऱ्याने शूट केले गेले आहे. सेटवर कुठलाही प्रोफेशन क्रू नसताना हा चित्रपट शूट करण्यात आला. याबद्दल रिमा दास यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्याकडे चित्रपट बनवण्यासाठी केवळ एक डिजिटल कॅमेरा आणि एक कथा केवळ या दोनच गोष्टी होत्या. या दोनचं गोष्टीच्या भरवशावर चित्रपट पूर्ण करावा लागेल, हे मला ठाऊक होते.
‘विलेज रॉकस्टार्स’मध्ये रिमाने वन वूमन आर्मीप्रमाणे काम केले. चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन, निर्माता, एडिटर सगळे काही त्यांनी एकटीनेच केले.
चित्रपटाची कथा पूर्ण करण्यासाठी रिमा यांना साडे तीन वर्षे लागलीत. १३० दिवसांत याचे शूटींग पूर्ण झाले. या चित्रपटाचे बहुतांश शूटींग आसामच्या छायागावात पूर्ण झाले. चित्रपटाची स्टारकास्ट अगदी नवखी आहे. म्हणजे, त्यापैकी कुणीही कधीही अभिनय केलेला नाही.
आॅस्करवारी करणारा ‘विलेज रॉकस्टार्स’ हा आसामचा दुसरा चित्रपट आहे. रिमा याबदद्ल म्हणतात, जोपर्यंत तुम्हाला ओळख मिळत नाही, तोपर्यंत सगळे काही कळीण आहे, असेच तुम्हाला वाटते़ ओळख मिळाली, सगळे काही सहज सोपे वाटू लागते. पण अनेक लोक प्रयत्न करण्यास घाबरतात. माझा चित्रपट आॅस्करसाठी जाणे, यावरून सगळे काही शक्य आहे, हेच मला कळले.
‘विलेज रॉकस्टार्स’मध्ये मुख्य भूमिका साकारणारी बालकलाकार भनिता दास रिमा दास यांची चुलत बहीण आहे़ हा भनिताचा पहिला चित्रपट आहे़ राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी भनिता आसामची पहिली बालकलाकार आहे़