Video : हातात 'ऑस्कर', चेहऱ्यावर आनंद! निर्मात्या गुनीत मोंगा यांचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 09:49 AM2023-03-17T09:49:23+5:302023-03-17T09:51:28+5:30
यंदाचा ऑस्कर सोहळा भारतीयांसाठी खूपच खास होता.
Oscars 2023 : यंदाचा ऑस्कर सोहळा भारतीयांसाठी खूपच खास होता. भारताने दोन पुरस्कार पटकावले. डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म या कॅटेगरीमध्ये भारताला ऑस्कर मिळाला. गुनीत मोंगा (Guneet Monga) यांच्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' (The Elephant Whisperers) या लघुपटाने पुरस्कार नावावर करत देशाचे नाव उंचावले. कार्तिकी गोन्साल्व्हिस (Kartiki Gonsalves) यांनी लघुपट दिग्दर्शित केला आहे तर गुनीत मोंगा यांनी निर्मिती केली आहे. ऑस्कर जिंकल्यानंतर गुनीत मोंगा कालच मुंबईत परतल्या. यावेळी विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत झाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
निर्मात्या गुनीत मोंगा काल मुंबईविमानतळावर दाखल झाल्या तेव्हा त्यांच्या हातात ऑस्करची ट्रॉफी होती. ट्रॉफी उंचावत त्यांनी सर्वांसोबत आनंद व्यक्त केला. तसंच यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. सर्वांनी हार घालत त्यांचे जंगी स्वागत केले. तर काही महिलांनी त्यांचं औक्षण केलं. लोकांचं एवढं प्रेम पाहून त्याही भारावून गेल्या.
ऑस्कर मिळाल्याचा आनंद खरोखरंच वेगळाच आहे.यामुळे तुम्ही देशाचं नाव उंचावता याचा जास्त आनंद होतो. तोच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. गुनीत मोंगा यांना यापूर्वीही त्यांच्या डॉक्युमेंटरीसाठी ऑस्कर नॉमिनेशन मिळाले आहे मात्र प्रत्येक वेळेस त्या शर्यतीतून बाहेर पडल्या. अखेर 'द एलिफंट व्हिस्परर्स' डॉक्युमेंटरीची दखल घेतली गेली आणि त्यांना ऑस्कर जाहीर झाला.
'द एलिफंट व्हिस्परर्स' ही डॉक्युमेटरी 'नेटफ्लिक्स'वर उपलब्ध आहे. ही ४० मिनिटांची डॉक्युमेंटरी आहे. तमिळनाडूच्या आदिवासी जोडप्याने दोन हत्तींची कशाप्रकारे काळजी घेतली याचं चित्रण करण्यात आलं आहे. ही डॉक्युमेंटरी सत्यघटनेवर आधारित आहे.