Join us

OSCARS 2017: आॅस्कर पुरस्कारावर बॉलीवूड सिलेब्रेटींची टिंगलटवाळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2017 8:42 AM

आॅस्कर पुरस्कार सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान आहे याबाबत कोणाचेच दुमत नसावे. त्यामुळे तर जगभरातील सिने कलाकारांचे ही गोल्डन बाहुली ...

आॅस्कर पुरस्कार सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान आहे याबाबत कोणाचेच दुमत नसावे. त्यामुळे तर जगभरातील सिने कलाकारांचे ही गोल्डन बाहुली मिळवण्याचे स्वप्न असते. आणि जेव्हा अपार कष्ट करून तुमचा चित्रपट नामांकित होतो आणि त्यानंतर बेस्ट पिक्चर म्हणून घोषणाही होते तेव्हाचा आनंद शब्दांत न सांगण्यासारखा आहे.परंतु जर तुम्हाला सांगितले की, आमच्यकडून चुकीने हा पुरस्कार दिला गेला. खरे विजेते दुसरेच कोणी तरी आहेत. तर मग तुम्हाला कसे वाटेल? हे तुम्ही ‘ला ला लँड’च्या निर्मात्यांना जाऊन विचारा. कारण त्यांच्यावर आज तशी पाळी आली, ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. संपूर्ण सोहळा निर्विघ्नपणे पार पडत असताना अगदी शेवटच्या क्षणी माशी शिंकली आणि संपूर्ण रंगाचा बेढंग झाला. वॅरेन बेटी आणि फे डुनावे यांनी ‘ला ला लँड’ला बेस्ट फिल्म म्हणून घोषित केले. त्यामुळे अगदी आनंदात या चित्रपटाची टीम स्टेजवर पोहचली आणि भावनिक स्पीच देऊ लागली. ALSO READ: आॅस्कर पुरस्कारांमध्ये गोंधळ; सोशल मीडिया जोक्सला आले उधाण!मग तेवढ्यात त्यांना थांबवण्यात आले आणि चुकी झाली असे सांगत ‘मूनलाईट’ खरा विजेता आहे म्हणून घोषित करण्यात आले. अशा चुकीमुळे क्षणभर तर कोणालाच कळाले नाही की, काय झाले. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात झालेल्या या गोंधळामुळे सोशल मीडियावर सध्या तुफान विनोद सुरू आहेत.त्यामध्ये आपले बॉलीवूड कलाकारही मागे नाहीत. करण जोहर, फराह खान, शबाना आझमी, सोनू सूद, सैयमी खेर यांनी ट्विटरवर आश्चर्य व्यक्त करीत आॅस्करची चांगलची टिंगल टवाळी केली. करणने लिहिले की, ‘आॅस्करच्या इतिहासातील ही आतापर्यंतचा सर्वांत मोठी चूक असेल.’ 
फराहने विनोदबुद्धीने ट्विट केले की, ‘कार्यक्रमाच्या शेवटी सर्वात बेस्ट गोष्ट ठेवत असतात. आॅस्करमध्येही तसेच घडले. निदान आपल्याकडील अवॉर्ड शोमध्ये अशी चूक होत नाही. कारण शेवटी जो कोणी उपस्थित राहिल त्याला पुरस्कार देण्याची आपल्याकडे प्रथा आहे.’ 
सोनू सूदने म्हणतो की, मला तर विश्वासच बसत नाही की एवढी मोठी चूक कोणी करू शकते. आणि तेदेखील आॅस्करमध्ये!‘मिर्झिया’ स्टार सैयामी खेरने ट्विट केले, असे खरंच आॅस्करमध्ये घडले?