अनुष्का शर्माची ‘पाताललोक’ ही वेबसीरिज रिलीज झाली तेव्हापासून चर्चेत आहे. विशेष म्हणजे, रिलीज होताच या वेबसीरिजने अनेक वाढ ओढवून घेतले आहेत. सर्वप्रथम गोरखा समुदायाने या वेबसीरिजविरोधात तक्रार केली. यानंतर उत्तर प्रदेशच्या भाजपा आमदाराने तक्रार दाखल केली. आता सिक्कीमचे खासदार इंद्र हंग सुब्बा यांनीही अनुष्काच्या या वेबसीरिजवर आक्षेप नोंदवत याप्रकरणी थेट माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिले आहे. ‘पाताललोक’विरोधात त्वरित कारवाई करण्याची मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.
त्यांनी पत्रात लिहिले, ‘अॅमेझॉन प्राईमवरील या वेबसीरिजच्या दुस-या एपिसोडमध्ये नेपाळी बोलणा-या समुदायाविरोधात जातीसूचक शब्दांचा प्रयोग केला गेला आहे. देशाच्या अधिकृत भाषांमध्ये 22 भाषांमध्ये नेपाळी भाषेचाही समावेश आहे. कोट्यवधी लोकांची ही मातृभाषा आहे. अशास्थितीत ‘पाताललोक’मधरल काही विशिष्ट दृश्ये अपमानास्पद व आक्षेपार्ह आहेत. ही दृश्ये केवळ या समुदायाचा भावना दुखावणारी नाहीत तर वंशवादाचे एक उदाहरण आहे. कोरोना संकटात अनेक पूर्वोत्तर राज्यातील लोक वंशवादाचे शिकार होत असताना या वेबसीरिजमधील दृश्ये याला चालना देणारी आहेत. मी याची निंदा करतो. ही आक्षेपार्ह दृश्ये त्वरित हटवण्यात यावी शिवाय निर्मात्याने माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी आपल्या पत्रात केली आहे.
अनुष्काची निर्मिती असलेली ही वेबसीरिज आधी लोकांनी चांगलीच डोक्यावर घेतली. पण नंतर ती वादातही सापडली. एक नाही तर अनेक वादात़. सोशल मीडियावर ‘पाताललोक’ या वेबसीरिजवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत असताना लॉयर्स गिल्डचे सदस्य वीरेन सिंग गुरुंग यांनी या सीरिजसंदर्भात अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस पाठवली होती. वेबसीरिजमध्ये जाती सूचक शब्दांचा वापर केला असल्याचा आरोप त्यांनी या नोटीसमध्ये केला होता. यानंतर भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी ‘पाताललोक’ प्रकरणी अनुष्काविरोधात तक्रार दाखल केली होती. गुर्जर यांनी अनुष्कावर अनेक गंभीर आरोप करत याप्रकरणी अनुष्काविरोधात रासुकाअंतर्गत कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती.गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया युजर्सनी ‘पाताल लोक’वर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. दोन वेगवेगळ्या कारणांसाठी या सीरिजला विरोध होत आहे. एका गटाच्या मते, यातील अनेक दृश्ये हिंदूंच्या भावना दुखावणारी आहेत. यात सीबीआय, सरकार, पोलिस आणि सरसकट सर्व हिंदूंना वाईट ठरवले आहेत. तर दुस-या एका गटाच्या मते, ही सीरिज इस्लामविरोधी आहे. इस्लामच्या धर्मग्रंथांना अतिरेकी साहित्याच्या रूपात दाखवण्याचा आरोप या गटाने केला आहे.
‘पाताल लोक’ या वेबसीरिजमध्ये जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत आहे. त्याशिवाय नीरज काबी, इश्वाक सिंग, अभिषेक बॅनर्जी वस्तिका मुखर्जी, गुल पनाग, विपिन शर्मा, आकाश खुराणा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.