बॉलिवूड स्टार अनुष्का शर्माची निर्मिती असलेली ‘पाताल लोक’ ही वेबसीरिज सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या या सीरिजवर सुरुवातीला लोकांच्या उड्या पडल्या . पण आता या सीरिजवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. होय, सोशल मीडियावरच्याच अनेक युजर्सनी ‘पाताल लोक’वर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. केवळ इतकेच नाही तर अनुष्का तुला लाज वाटायला हवी, तू यासाठी माफी मागायला हवी, असेही युजर्सनी म्हटले आहे.
दोन वेगवेगळ्या कारणांसाठी या सीरिजला विरोध होत आहे. एका गटाच्या मते, यातील अनेक दृश्ये हिंदूंच्या भावना दुखावणारी आहेत. यात सीबीआय, सरकार, पोलिस आणि सरसकट सर्व हिंदूंना वाईट ठरवले आहे. तर दुस-या एका गटाच्या मते, ही सीरिज इस्लामविरोधी आहे. इस्लामच्या धर्मग्रंथांना अतिरेकी साहित्याच्या रूपात दाखवण्याचा आरोप या गटाने केला आहे.
तूर्तास या दोन्ही गटांनी ‘पाताल लोक’वर बहिष्कार घालण्याची तसेच अनुष्का शर्माच्या माफीची मागणी केली आहे. ‘शेम आॅन यू अनुष्का’ अशा शब्दांत युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘पाताल लोक’ या वेबसीरिजमध्ये जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत आहे. त्याशिवाय नीरज काबी, इश्वाक सिंग, अभिषेक बॅनर्जी वस्तिका मुखर्जी, गुल पनाग, विपिन शर्मा, आकाश खुराणा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ही वेबसीरिज हाथीराम चौधरी या एका पोलिस अधिका-याची कथा आहे. कथा आहे दिल्लीची. जिथे यमुनाच्या पूलावर चार आरोपींना पकडले जाते. यांच्यावर एका टॉपचा पत्रकार व न्यूज अँकर संजीव मेहरा (नीरज काबी)च्या मर्डरचा कट रचल्याचा आरोप असतो. हे प्रकरण पोलीस हाथी राम चौधरी (जयदीप अल्हावत)ला दिले जाते. हाथी राम यमुना पार केल्यावर असलेल्या पोलीस ठाण्यात काम करणारा साधारण पोलीस असतो. पण या एका प्रकरणाच्या निमित्ताने हाथीरामला आता स्वत:ला सिद्ध करायचे असते. मी हिरो आहे, हे पोलिस डिपार्टमेंटलाच नाही तर स्वत:च्या कुटुंबालाही त्याला दाखवून द्यायचे असते. तो यात यशस्वी होतो की नाही, हे पाहण्यासाठी तुम्हाला ही वेबसीरिज बघावी लागेल.