‘पद्मावती’ला करणी सेनेचा विरोधाचा सूर कायम; सेन्सॉर बोर्डाला दिला ‘हा’ सल्ला!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 2:09 PM
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा वादग्रस्त ठरत असलेल्या ‘पद्मावती’ला सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनकडून (सीबीएफसी) काहीसा हिरवा कंदील दाखविला ...
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा वादग्रस्त ठरत असलेल्या ‘पद्मावती’ला सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनकडून (सीबीएफसी) काहीसा हिरवा कंदील दाखविला जात असला तरी, करणी सेनेचा चित्रपटाला विरोध कायम असल्याचे दिसून येत आहे. सेन्सॉरने ‘पद्मावती’बद्दल घेतलेल्या निर्णयाची माहिती मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून करणी सेनेला समजताच त्यांनी आपल्या विरोधाची धार कायम असल्याचे म्हटले. राजपूत करणी सेनेचे संयोजक लोकेंद्र सिंग कालवी यांनी म्हटले की, ‘अजून बरेचसे स्पष्टीकरण येणे बाकी आहेत. त्यामुळे याविषयी काहीही बोलणे घाईचे ठरेल. आमचा मार्ग स्पष्ट आहे हे सर्वांना माहिती आहे.’ तर राजस्थान राजपूत सभेचे अध्यक्ष गिरीराज सिंग लोटवाडा यांनी म्हटले की, सेन्सॉर बोर्ड कमिटीच्या सूचनांना बगल देत असून, निर्मात्यांना मदत करीत आहे. हे देशाचे दुर्भाग्य आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने ‘पद्मावती’चा विरोध कायम ठेवणार आहोत.’कालवी आणि लोटवाडाने एका न्यूज एजंन्सीबरोबर बोलताना अशा प्रतिक्रिया दिल्या. कालवीने म्हटले की, ‘हा चित्रपट गठीत केलेल्या नऊ लोकांची कमिटी बघणार होते. परंतु तीन सदस्यांनीच हा चित्रपट बघितला. या तिन्ही सदस्यांनी नेमक्या काय सूचना दिल्या हे अद्यापपर्यंत समोर आले नाही. त्यामुळे आताच याविषयी कुठलीही प्रतिक्रिया देणे घाईचे ठरेल. मात्र आम्ही सुरुवातीपासून जो मार्ग निवडला आहे, तोच मार्ग पुढेही कायम असेल, तर लोटवाडा यांनी सांगितले की, बोर्डाने ‘पद्मावती’बद्दल जी कमिटी गठीत केली होती, त्या कमिटीकडून चित्रपटाविषयी प्रतिकूल प्रतिक्रिया दिल्या गेल्या. मग बोर्डाने चित्रपटातील २६ दृश्यांना कात्री लावण्याचा अन् चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय कसा घेतला?पुढे बोलताना लोटवाडा यांनी म्हटले की, ‘बोर्ड पारदर्शी असायला हवे. त्यांनी राष्टÑहिताच्या दृष्टीने विचार करायला हवा. बोर्ड त्यांनी गठीत केलेल्या कमिटींच्याच शिफारशी ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याने कमिटी गठीत करण्याचा काय अर्थ? त्यामुळे पुढच्या काळातही आम्ही लोकशाही मार्गाने चित्रपटाला विरोध करतच राहणार आहोत. आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याविषयी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, तर मेवाड राजघराण्याचे सदस्य लक्ष्यराज मेवाड यांनी म्हटले की, ‘पद्मावती’बद्दल नुकतीच माध्यमातून माहिती मिळाली आहे. जोपर्यंत संपूर्ण स्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत काहीही सांगता येणार नाही. दरम्यान, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ला विविध राजपूत संघटनांनी विरोध केला होता. ज्यामुळे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका साकारणाºया दीपिका पादुकोणचे नाक कापण्याचीही धमकी दिली गेली.