अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेचा १ नोव्हेंबरला ५३ वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या परिवारासह चित्रपटसृष्टीतील मान्यवरांची खास उपस्थिती लाभली होती. १९८० - ९० चा पडदा व्यापून टाकणाऱ्या या गुणी अभिनेत्रीचा प्रवास अखंड सुरु आहे. सध्या त्या आशुतोष गोवारीकरांच्या हिंदी महत्वकांशी पानिपतमध्ये तर मराठीत शशांक उदापूरकरांच्या ‘प्रवास’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करीत आहेत. त्यांनी आजतागायत विविध जातकुळीच्या तसेच नायिकाप्रधान चित्रपटांमध्ये केलेल्या प्रमुख भूमिका अजरामर ठरल्या आहेत. या मराठमोळ्या अभिनेत्रीने हेवा वाटावा असे यश हिंदी चित्रपटसृष्टीत कमावले आहे. तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनिल कपूर, बोनी कपूर, पूनम ढिल्लों, शक्ती कपूर, शिवानी कपूर, श्रद्धा कपूर, सिद्धांत कपूर, तेजस्विनी कोल्हापुरे, मुलगा प्रियांक व पती प्रदीप(टूटू) शर्मांसह दिग्गज मंडळी उपस्थित होती.
पद्मिनी एक अशी कलाकार आहे जी लहान वयात सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. शोमॅन राज कपूर यांच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ या १९७८ साली आलेल्या चित्रपट त्यांनी झीनत अमान यांच्या बालपणाची व्यक्तिरेखा आपल्या अभिनयाने सशक्त केली. त्यांनी साकारलेली ‘छोटी रूपा’ रसिकांच्या काळजात स्वतंत्र घर करू शकली, ती लहानग्या पद्मिनीच्या समजूतदार अभिनयामुळे. बालकलाकार म्हणूनही त्यांची कारकीर्द जोरकस राहिली आहे. लहानवयात त्यांनी केलेल्या एकापेक्षा एक भूमिका आणि उंचावत जाणारा अभिनयाचा आलेख लहान वयातच त्यांची समज परिपक्व झाल्याची साक्ष देत होता. याचे श्रेय त्या त्यांच्या मातापित्यांना देतात.
पद्मिनी कोल्हापुरेंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याची भाची अर्थात आजची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरने हिरीरीने सहभाग घेतला होता. तिचा उत्साह दांडगा होता. या विषयी ती सांगते, पद्मिनी मावशी तिच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. तिचा अभिनय पाहताच आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. मावशीची हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष जागा आहे. पद्मिनीची बहीण शिवांगी आणि शक्ती कपूर यांना श्रद्धा आणि सिद्धांत हि त्यांची मुले आहेत. आणि ते दोघेही चित्रपटसृष्टीत व्यस्त असून लवकरच पद्मिनी कोल्हापुरे आणि तिचे पती प्रसिद्ध निर्माते प्रदीप(टूटू) शर्मा यांचा मुलगा प्रियांक हाही हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. अभिनेत्री तेजस्विनी हि पद्मिनीची लहान बहीण असून तिच्या छोट्या मुलीसह तीही या सोहळ्यात सहभागी झाली होती.