80 च्या दशकात जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना वेड लावलं ती अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे (padmini kolhapure). त्याकाळी त्यांच्या अभिनयाचा आणि सौंदर्याचा प्रत्येक जण चाहता होता. 'प्रेम रोग' या सिनेमातून तर त्यांनी तुफान लोकप्रियता मिळवली. त्या काळात पद्मिनी आपली पत्नी व्हावी अशी अनेक अभिनेत्यांची इच्छा होती. परंतु, पद्मिनी ज्यांच्या प्रेमात पडल्या त्यांच्यासाठी त्यांनी घरच्यांचाही विरोध पत्करला होता. त्यामुळेच आज त्यांची लव्हस्टोरी जाणून घेऊयात.
वयाच्या 15 व्या वर्षी केली अभिनयाची सुरुवात
पद्मिनी कोल्हापुरे यांनी वयाच्या १५ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऐसा प्यार कहाँ या सिनेमाने त्यांचं नशीब पालटलं. या सिनेमानंतर त्यांच्या फिल्मी करिअरसोबतच पर्सनल आयुष्यातही अनेक मोठे बदल घडले. या सिनेमाचे निर्माचे प्रदीप शर्मा यांच्या प्रेमात पद्मिनी पडली आणि त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली.
प्रेमासाठी सोडली कुटुंबियांची साथ
ऐसा प्यार कहाँ या सिनेमाच्या सेटवर पद्मिनी आणि प्रदीप यांची पहिली भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. वयाच्या २१ व्या वर्षी पद्मिनी यांनी प्रदीपसोबत लग्न करायचा निर्णय घेतला. परंतु, घरातून परवानगी मिळणार नाही या भीतीने त्या घरातून पळून आल्या आणि १४ ऑगस्ट १९८६ मध्ये त्यांनी प्रदीप शर्मासोबत लग्न केलं.
पूनम ढिल्लोंने केली मदत
पद्मिनी कोल्हापूरे घर सोडून आल्यानंतर अभिनेत्री पूनम ढिल्लो यांनी तिला प्रचंड मदत केली होती. प्रदीप शर्मासोबत लग्न करण्यासाठी पूनमने तिचे दागिने आणि साड्या पद्मिनीला दिल्या होत्या. एका मुलाखतीमध्ये पूनम यांनी याविषयी खुलासा केला होता.