Sonakshi Sinha Wedding : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा प्रियकर झहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधणार आहे. सोनाक्षी सिन्हा २३ जून रोजी प्रियकर झहीर इक्बाल सोबत जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्न करणार आहे, शत्रुघ्न सिन्हा आणि त्याचा भाऊ लव सिन्हा यांच्या वक्तव्यावरून असे दिसते की लग्नाच्या निर्णयात त्यांचा सहभाग नव्हता, हा निर्णय सोनाक्षी सिन्हाचा स्वतःचा आहे. सोनाक्षीच्या लग्नाला आता केवळ सहा दिवस बाकी आहेत. सोनाक्षी-झहीरच्या लग्नाचे आमंत्रणही समोर आले आहे. मात्र तिच्या घरच्यांनी ज्या पद्धतीने लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे ते पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सोनाक्षीचे वडील अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे तिच्यावर नाराज असून ते आपल्या मुलीच्या लग्नालाही जाणार नसल्याची चर्चा सध्या माध्यमात सुरु आहेत. मात्र शत्रुघ्न सिन्हा हे सोनाक्षी सिन्हाने तिच्या लग्नाबद्दल माहिती न दिल्याने नाराज आहेत असल्याचे तिचे मामा पहलाज निहलानी यांनी म्हटलं आहे. चित्रपट निर्माते आ पहलाज निहलानी हे सिन्हा कुटुंबाच्या जवळचे आहेत. यासोबत त्यांनी पुष्टी केली शत्रुघ्न सिन्हा हे या कार्यक्रमाचा भाग असतील. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा हे सोनाक्षीच्या लग्नाला जाणार नसल्याची केवळ अफवा असल्याचे समोर आलं आहे.
गेल्या आठवड्यात सोनाक्षी सिन्हा प्रियकर झहीर इक्बालसोबत लग्न करत असल्याची बातमी समोर आली होती. लग्नाच्या बातमीवर पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना शत्रुघ्न सिन्हा यांनी कबूल केले की त्यांना या लग्नाबद्दल माहिती नव्हती. यामुळे ते नाराज झाले होते. यावर बोलताना निहलानी म्हणाले की ते नाराज जरी असले तरी त्यांची नाराजी फार काळ टिकणार नाही. शत्रुघ्न सिन्हाही या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
"हा, पण ते सोनाक्षीसोबत जास्त काळ नाराज राहू शकत नाही. ती त्याची लाडकी आहे. लग्नाला उपस्थित न राहण्याचा प्रश्नच येत नाही. शत्रुजी म्हणाले की, आजकालची मुलं थेट सांगतात पण परवानगी घेत नाहीत. सोनाक्षीने तिच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले तर ते नाराज का असतील? शत्रुजींनी स्वत: चाळीस वर्षांपूर्वी आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले होते.मीसुद्धा स्वतःचा जीवनसाथी निवडला होता. एखाद्याने आपल्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नये," असे पहलाज निहलानी म्हणाले.
दरम्यान, सोनाक्षी-झहीरच्या लीक झालेल्या लग्नाच्या आमंत्रणावर विश्वास ठेवला तर, दोघेही जवळपास सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि २३ जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याने अद्याप त्यांच्या लग्नाचे आमंत्रण आणि लग्नाच्या अफवांवर कोणतेही वक्तव्य केलेले नाही.