फिल्मफेअर पुरस्काराची नुकतीच घोषणा झाली असून या सोहळ्यात आलिया भट आणि रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ने 13 पुरस्कार जिंकत सर्व विक्रम तोडले. रणवीर आणि आलिया दोघांनाही या सिनेमासाठी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाची दिग्दर्शिका जोया अख्तरला बेस्ट डायरेक्टरचा तर सिद्धांत चतुर्वेदी आणि अमृता सुभाष यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता आणि साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आणखीही अनेक पुरस्कार या चित्रपटाने आपल्या नावे केलेत. पण फिल्मफेअर पुरस्कारात गली बॉयला इतके सारे पुरस्कार मिळणे लोकांना रुचलेले नाहीये. सोशल मीडियावर तर या पुरस्कारांची खिल्ली उडवली जात आहे.
सोशल मीडियावर सध्या फिल्मफेअरचीच चर्चा सुरू असताना फिल्मफेअर पुरस्कार 2020 च्या विकीपीडिया पेजवर एक धक्कादायक गोष्ट पाहायला मिळाली आहे. या विकीपीडिया पेजवर कोणत्या चित्रपटाला किती पुरस्कार मिळाले याविषयी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळणाऱ्या गली बॉय या चित्रपटाच्या समोर पेड असे लिहिण्यात आले आहे हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विकीपीडियाने लगेचच ही गोष्ट त्यांच्या पेजवरून डीलिट केली असली तरी सध्या याचीच चर्चा रंगली आहे. विकीपीडिया पेजवर चित्रपटाच्या नावासमोर पेड कोणी लिहिले हे अद्याप तरी समजलेले नाहीये.
फिल्मफेअर या पुरस्कार सोहळ्यानंतर ट्विटरवर बॉलिवूडप्रेमी अॅक्टिव्ह झाले असून मजेदार मीम्स आणि जोक्सचा सोशल मीडियावर पूर आला आहे. या मीम्सनी लोकांचे भरपूर मनोरंजन केले असून सर्वाधिक मीम्स आणि जोक्स शेअर केले गेलेत ते ‘गली बॉय’वरून. या पुरस्कार सोहळ्याचे नाव ‘फिल्मफेअर’ नाही तर ‘गली अवार्ड’ ठेवा, अशा आशयाचे मीम प्रचंड व्हायरल झाले आहेत.