Fawad Khan Post: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात उमटत आहेत. काश्मीर खोऱ्यातील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना गोळ्या घालून मारले. या भ्याड हल्ल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकरांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त झाले आहेत.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने (Fawad Khan) इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या सांत्वनपर पोस्टद्वारे फवादने दु: ख व्यक्त केलं आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय, "पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या बातमीने प्रचंड दु: ख झालं आहे. आमच्या संवेदना आणि प्रार्थना या घटनेतील पीडितांसोबत आहेत. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांना हिंमत आणि सावरायला बळ मिळो, अशी आम्ही प्रार्थना करतो." अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्याने आपली प्रतिक्रिया मांडली आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या भीषण हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या देशावर भारताने बुधवारी कायदेशीर स्ट्राइक केला. सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया जोवर थांबत नाहीत तोवर दोन्ही देशांतील सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.