पाकिस्तानच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री फिरदौस बेगम यांचे निधन झाले. बुधवारी लाहोर येथे त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्या 73 वर्षांच्या होत्या.पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी फिरदौस यांना ब्रेन हॅम्रेजचा अटॅक आला. यानंतर त्यांना लाहोरच्या एका रूग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान दुस-या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पाकिस्तानी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.एकेकाळी फिरदौस बेगम या पाकिस्तानी सिनेमाच्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. 60 व 70 च्या दशकात त्यांनी अनेक सिनेमात काम केले. 1963 साली ‘फानूस’ या सिनेमाद्वारे त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. यात त्यांनी सहअभिनेत्रीची भूमिका साकारली होती. यानंतर अनेक सिनेमात त्यांनी सहअभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या.
1965 साली त्यांना मुख्य अभिनेत्री म्हणून संधी मिळाली. ‘मलंगी’ या सिनेमात त्यांनी मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. ‘हीररांझा’ या सिनेमातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती.फिरदौस बेगम यांनी ऊर्दू, पंजाबी आणि पश्तू भाषांमधील सुमारे 150 सिनेमात वेगवेगळ्या भूमिका वठवल्या. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर पाकिस्तानी अभिनेते कमाल खानसोबत त्यांनी लग्न केले. मात्र 1967 मध्येच त्यांच्या पतीचे निधन झाले. यानंतर फिरदौस यांनी ‘हीररांझा’चे अभिनेते एजाज दुरानी यांच्यासोबत दुस-यांदा लग्न केले. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे.