२०१६ साली रिलीज झालेला 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) रोमँटिक ड्रामा पुन्हा थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. तेव्हा सिनेमाला बॉक्सऑफिसवर यश मिळालं नव्हतं. मात्र नंतर तरुणाईने सिनेमाची खूप स्तुती केली होती. आता रि रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवरही सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. सिनेमातली मुख्य अभिनेत्री मावरा होकेन पाकिस्तानी आहे. नुकतीच ती लग्नबंधनात अडकली. मावराला 'सनम तेरी कसम' नंतर तीन सिनेमांची ऑफर होती मात्र नंतर तिला त्यातून काढण्यात आलं होतं असा खुलासा तिने केला आहे.
'कनेक्ट सिने' ला दिलेल्या मुलाखतीत मावरा म्हणाली, "सनम तेरी कसम चालला नव्हता आणि नंतर मी ज्या इतर सिनेमांमध्ये काम करणार होते त्यातून मला बाहेर पडावं लागलं. यामागे अनेक कारण होती. याविषयी मी कधीच बोलणार नाही हे मी तेव्हाच ठरवलं होतं. कारण जेव्हा तुम्ही एखादा प्रोजेक्ट करु शकत नाही तेव्हा ज्याने तो प्रोजेक्ट केला त्यांचाच तो होतो. त्यामुळे मी त्याविषयी बोलणार नाही."
'सनम तेरी कसम २' बाबत मावरा म्हणाली, "मी त्यात काम करु किंवा अजून कोणी पण मला इतकं माहित आहे की मी आज आमच्या निर्मात्यांसाठी खूप खूश आहे. आज सिनेमाला जे यश मिळतंय त्यासाठी ते पात्र आहेत. आमच्या कोणाहीपेक्षा जास्त दीपक सर आमचे निर्माते ते जास्त यासाठी पात्र आहेत. देव करो याचा दुसरा भाग यापेक्षाही जास्त यशस्वी होवो. मग मी त्यात असो किंवा नसो. मी नेहमीच सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना करेन. जर शक्य असेल तर मलाही नक्कीच 'सनम तेरी कसम २'मध्ये काम करायला आवडेल. जर शक्य नाही झालं तरी काही हरकत नाही. ९ वर्षांनंतर आज जे यश मिळतंय त्यानंतर तक्रार कशाची. हे मिरॅकल आहे. मला भारतातून अनेक जणांचे मेसेज येताएत. माझं लग्न होतं आणि माझा सिनेमा इतिहास रचत होता हे पाहून मी भारावले. माझा नशिबावर विश्वास आहे त्यामुळे नशिबात असेल तर नक्कीच होईल."