आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांना उत्सुकता असते. पण, लखलखत्या दुनियेत असणाऱ्या सगळ्याच कलाकारांच्या नशीबी तसं ग्लॅमरस आयुष्य येत नाही. करिअरमध्ये यशाचं शिखर गाठलेले कलाकार अनेकदा वैयक्तिक आयुष्यात मात्र प्रचंड दु:खी असतात. पाकिस्तानी अभिनेत्री रानी बेगमचं आयुष्यही असंच काहीसं होतं.
सौंदर्याने भल्याभल्यांना भुरळ घालणाऱ्या रानी बेगमचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील ड्रायव्हर होते. प्रसिद्ध गायिका मुख्तार बेगम यांच्याकडे ते काम करायचे. मूल नसल्याने मुख्तार बेगम यांनीच रानी बेगमला दत्तक घेतलं होतं. रानी बेगम यांनीही गायिका व्हावं असं त्यांना वाटत होतं. परंतु, गायिकेचा गळा नसल्याने रानी बेगम यांना त्यांनी अभिनेत्री बनवण्याचं ठरवलं. १६व्या वर्षापासूनच त्यांनी अभिनयातील कारकीर्दीला सुरुवात केली होती. महबूब या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं होतं. पण त्यांचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं.
रानी बेगम यांनी देवर भाभी या चित्रपटाचे दिग्दर्शक हसन तारीक यांच्याबरोबर पहिलं लग्न केलं होतं. त्यांना राबिया ही मुलगीही होती. पण, लग्नानंतर काहीच वर्षांत त्यांच्यात खटके उडू लागले. त्यानंतर रानी बेगम मुलीसह वेगळ्या राहू लागल्या. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर रानी बेगमच्या आयुष्यात निर्माता मिया जावेद यांची एन्ट्री झाली. त्यांनी पुन्हा संसार थाटण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांना कॅन्सर झाल्याचं समजताच पतीने त्यांची साथ सोडली.
कॅन्सरवरील उपचारासाठी रानी बेगम लंडनला पोहोचल्या. तिथे त्यांची आणि पाकिस्तानी क्रिकेटर सरफराज नवाज यांची भेट झाली. त्यांच्यातील मैत्रीचं काही दिवसांतच प्रेमात रुपांतर झालं. त्यांनी १९८५मध्ये लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. सरफराज यांच्या राजकीय प्रवासात रानी बेगमची त्यांना खूप मदत झाली. पण, त्यानंतर त्यांचं नातं तुटलं आणि रानी बेगमला पुन्हा कॅन्सरने जखडलं. यातच १९९३ साली त्यांचा मृत्यू झाला.