Join us  

पाकिस्तानी संगीतकार हानिया असलम यांचं निधन, स्वानंद किरकिरे यांची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 10:39 AM

Pakistani musician singer Hania Aslam passes away: पाकिस्तानी कोक स्टु़डिओमध्ये त्यांची गाणी लोकप्रिय झाली आहेत.

पाकिस्तानी गायिका हानिया असलम (Haniya Aslam) यांचं वयाच्या ३५ व्या वर्षी निधन झालं आहे. काल ११ ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची चुलत बहीण आणि गायिका झेब बंगश यांनी सोशल मीडियावर ही बातमी दिली. हृदयविकाराच्या धक्क्याने हानिया असलम यांचं निधन झालं. जेब आणि हानिया या बहि‍णींना मिळून अनेक गाणी बनवली. कोक स्टुडिओ पाकिस्तानमध्ये त्यांच्या गाण्यांची धूम असायची.

हानिया असलम यांच्या निधनानंतर भारतीय संगीतकार, गायक स्वानंद किरकिरे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. ते लिहितात, 'हानिया असलम आता आपल्यात नाही. हृदयविकाराच्या धक्क्याने तिचं काल रात्री निधन झालं. एका गाण्यासाठी एकत्र काम करताना  आमची खूप चांगली मैत्री झाली होती. तिच्यासोबत काही दिवसांपूर्वीच झालेलं शेवटचं संभाषण मी शेअर करत आहे. आम्ही ज्या अल्बमवर काम करत होतो तो आता  अपूर्णच राहिला आहे. झेब, आम्ही तुझ्या दु:खात सहभागी आहोत. या धक्क्यातून सावरण्यासाठी देव तुला बळ देवो. तोपर्यंत तुझा गोड आवाज आणि गिटारची धून आमच्या कानात वाजत राहील, तू नसण्याची आठवण देत राहील."

स्वानंद किरकिरे यांचं हानिया असलम यांच्यासोबतचं शेवटचं संभाषणही डोळ्यात पाणी आणणारं आहे. स्वानंद किरकिरे त्यांची विचारपूस करतात तेव्हा त्या लिहितात, 'जिंदगी खट्टी मिठी सर, झूमती जा रही है'. यावर स्वानंद किरकिरे  लिहितात, 'आह! झूमती रहे गाती रहे'. तर त्या पुन्हा लिहितात, 'टिमटिमाती रहे भिनभिनाती रहे'. हानिया असलम यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 

टॅग्स :स्वानंद किरकिरेसंगीतपाकिस्तानमृत्यूसोशल मीडिया