पाकिस्तानी मीडियाचे किस्से जगभर प्रसिद्ध आहेत. अनेकदा चुकीची, अर्धवट माहिती देऊन पाकिस्तानी मीडियाने स्वत:चे हसे करून घेतले आहे. यामुळे अनेकदा पाकी मीडिया सोशल मीडियावर ट्रोल झाला. पण यामुळे पाकी मीडियाच्या स्वभावात कुठलाही बदल झाला नाही. आता पाकिस्तानी मीडियाने काय करावे तर चक्क एका आरोपीच्या जागी बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा फोटो दाखवला.होय, सध्या यावरून पाकिस्तानी मीडियाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
आता हे संपूर्ण प्रकरण काय हे जाणून घेऊ यात.तर त्याचे झाले असे की, पाकिस्तानच्या न्यायालयाने 17 वर्षांनंतर राजकीय पार्टी मुहाजिर कौमी आंदोलन-हक्की (MQM) चा नेता आमिर खानची दुहेर हत्या प्रकरणातून मुक्तता केली. हे वृत्त पाकिस्तानी मीडियाने ठळकपणे प्रसिद्ध केले. पण हे वृत्त चॅनेलवर दाखवताना मुहाजिर कौमी आंदोलन-हक्की (MQM)चा नेता आमिर खानच्या जागी बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा फोटो लावून टाकला. पाकिस्तानी मीडियाला थोड्याच वेळात आपली चूक लक्षात आली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. कारण सोशल मीडियावर या चुकीचा बोभाटा झाला होता.
या वृत्ताचे स्क्रिनशॉट्स सोशलमीडियावर व्हायरल झालेत. मग काय, सोशल मीडियावर पाकिस्तानी मीडिया पुन्हा एकदा थट्टेचा विषय बनले. अनेक मीम्स, जोक्स व्हायरल झालेत.अद्याप आमिर खानने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पण नेटकरी मात्र जोरात आहेत.