Palash Sen : 'युफोरिया' फेम गायक पलाश सेन घालतात आईचं मंगळसूत्र, जाणून घ्या यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 11:02 AM2023-01-25T11:02:13+5:302023-01-25T11:04:14+5:30
'युफोरिया' रॉक बॅंड फेम गायक पलाश सेनने ९० च्या दशकात तरुणांच्या मनावर जादू केली.
Palash Sen : 'युफोरिया' (Euphoria) रॉक बॅंड फेम गायक पलाश सेनने ९० च्या दशकात तरुणांच्या मनावर जादू केली. त्यांच्या सुमधुर गाण्याने त्यांनी आपली एक वेगळी ओळख बनवली. 'माएरी', 'कभी आना तु मेरे गली' ही काही गाजलेली गाणी. पलाश सेन हे खऱ्या आयुष्यात खूपच साधे आहेत. त्यांच्याबद्दलची एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांच्या गळ्यात चक्क मंगळसूत्र असते. आता ते मंगळसूत्र का घालतात याचं उत्तर त्यांनी एका मुलाखतीत दिलं आहे.
मॅशेबल इंडिया या साईटला दिलेल्या मुलाखतीत पलाश सेन म्हणाले, 'माझी आई माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. तिने तिच्या आयुष्यात खूप कष्ट केले आहेत. फाळणीच्यावेळी ती केवळ ९ वर्षांची होती. ४ वर्षांच्या भावाला घेऊन ती एकटीच लाहोरवरुन जम्मू काश्मीरमध्ये आली. सर्व मुलं असलेल्या शाळेत ती एकटी मुलगी शिकली. १७ व्या वर्षी तिने घर सोडलं आणि लखनऊमध्ये तिने एमबीबीएस केलं.'
ते पुढे म्हणाले, 'माझे वडील गेल्यानंतर आईने मंगळसूत्र घालणं सोडून दिलं. मग मीच ते मंगळसूत्र घालायला लागलो. विशेषकरुन मी स्टेज परफॉर्मन्सवेळी मंगळसूत्र गळ्यात घालतो.यामुळे आई वडिलांचे आशिर्वादच माझ्याजवळ आहेत असं मला वाटतं. मंगळसूत्रालाच मी इजिप्तवरुन आणलेलं खारतुश (Khartoush) जोडलेलं आहे. त्यावर आई वडिलांचे नाव आहे.
पलाश सेन यांनी दिल्लीत १९९८ साली म्युझिक ग्रुप 'युफोरिया' सुरुवात केली. 'माएरी', 'धूम पिचक धूम', 'आना मेरी गली', 'अब ना जा', 'सोनेया', 'मेहफुज', आणि 'सोने दे मा' अशा अनेक गाण्यांसाठी युफोरिया बॅंड ओळखला जातो. 2001 साली आलेल्या मेघना गुलजार यांच्या फिल्हाल सिनेमातून त्यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केले.