आपल्या गोड हास्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आज ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. टीव्ही ते सिनेमापर्यंत आपल्या शानदार अभिनयातून तिचा वेगळा चाहतावर्ग तयार झाला आहे. नुकतीच तिने 'द काश्मीर फाईल्स' सिनेमात भूमिका साकारली. यामध्ये तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक केलं गेलं. पल्लवी आणि विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांची ओळख आणि नंतर प्रेम कसं झालं माहितीये का?
पल्लवीने अतिशय कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 'बदला' आणि 'आदमी सडक का' या सिनेमांमध्ये तिने बालकलाकाराची भूमिका केली होती. याशिवाय तिने अनेक मालिकांमध्येही काम केले. 90 च्या दशकात 'अल्पविराम' या मालिकेत बलात्कार पीडितेची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचं कौतुक झालं होतं. याशिवाय 'तहलका',सौदागर' सारख्या सिनेमांमध्ये तिने काम केलं.
कुठे झाली पल्लवी आणि विवेक अग्निहोत्री यांची भेट
विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशीच्या भेटीचा किस्सा फारच फिल्मी आहे. दोघंही पहिल्यांदा एका रॉक कॉन्सर्टमध्ये भेटले. दोघंही एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून तिथे आले होते. मात्र पहिल्या भेटीत पल्लवीला विवेक आवडले नाहीत. त्यांना फारच अॅटिट्युड असेल असं तिला वाटलं. मात्र हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली.
पहिल्या भेटीबद्दल विवेक यांनी एका मुलाखतीत सांगितले की,'आमची पहिली भेट एका कॉन्सर्टमध्ये झाली होती. आम्ही तेव्हा एकमेकांना ओळखत नव्हतो. पण तेव्हा आमच्यात एक साम्य होतं ते म्हणजे दोघांनाही त्या कॉन्सर्टमध्ये बोर होत होतं. मग आमच्यात बोलणं सुरु झालं आणि ओळख वाढली.
पल्लवी आणि विवेक तीन वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1997 मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले. त्यांना दोन मुलं आहेत. पल्लवी अभिनयासोबतच निर्माती देखील आहे. 'काश्मीर फाईल्स' सिनेमाची निर्मिती तिने पतीसोबत मिळून केली होती. सिनेमाने 250 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.