जेपी दत्ता यांचा ‘पलटन’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. होय, चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर निगम बोमजान यांनी जेपी दत्ता यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करत, कायदेशीर नोटीस बजावले आहे. ‘पलटन’ हा जेपी दत्ताचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाद्वारे जेपी दीर्घकाळानंतर वापसी करताहेत.जेपी दत्ता व त्यांच्या टीमने आपल्याकडून बरेच काम करून घेतले. मात्र अद्याप आपल्या कामाचा मोबदला दिलेला नाही. मी चित्रपटाच्या दोन शेड्यूलचे शूटींग केले. लेहमध्ये हे शूटींग झाले. पण अद्याप मला माझे पैसे मिळाले नाहीत. मी जेपी यांची मुलगी निधी दत्ता हिच्याकडे वेळोवेळी माझ्या पैशांची मागणी केली. पण तिने प्रत्येकवेळी उडवाउडवीची उत्तरे दिलीत. अखेर मला कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागला. पैशांशिवाय मला चित्रपटाचे ट्रेलर आणि गाण्यांमध्येही क्रेडिट दिले गेले नाही. जेपी दत्ता हे मोठे नाव आहे. त्यांच्याकडून मला अशा व्यवहाराची अपेक्षा नव्हती, असे निगम बोमजान म्हणाले. जेपी दत्ता यांच्याकडून माझे १० लाख आणि माझ्या सहाय्यकाचे ७ लाख रूपये मिळणे बाकी आहेत, असे त्यांनी सांगितले.दरम्यान ‘पलटन’च्या टीमने हे आरोप फेटाळून लावले आहेत. करारानुसार, बोमजान यांना पूर्ण पैसे चुकते करण्यात आले आहेत, असे टीमने स्पष्ट केले.जे. पी. दत्ता यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट एक युद्धकथा आहे. ६० च्या दशकातील भारत-चीन युद्धावर साकारणाऱ्या या चित्रपटात सोनू सूद, पुलकित सम्राट, अर्जुन रामपाल, सुनील शेट्टी, जिम्मी शेरगिल व जॅकी श्रॉफ दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल जे. पी. दत्ता कमालीचे उत्सुक आहेत. लोकांना एक नवी कथा सांगण्याची वेळ आली आहे. ‘पलटन’मधून देशाच्या इतिहासाचा एक नवा अध्याय लोकांपुढे मांडला जाईल, असे जे. पी. दत्ता एका मुलाखतीत म्हणाले होते. या चित्रपटातून छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दीपिका कक्कर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री ईशा गुप्तादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जेपी दत्ता यांचा ‘पलटन’ प्रदर्शनापूर्वीच वादात! सिनेमॅटोग्राफरने पाठवले नोटीस!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 7:50 PM