अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या 'पंचायत' या सीरिजच्या तिसऱ्या सीजनची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यामुळे या सीरिजविषयीचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न नेटकरी करत आहेत. यामध्येच पंचायत फेम अभिनेत्री सुनिता राजवार (Sunita rajwar) हिने इंडस्ट्रीविषयी मोठा खुलासा केला आहे. कलाविश्वात आर्टिस्ट्सला मिळणाऱ्या वागणुकीबद्दल भाष्य केलं आहे. लहान भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना इंडस्ट्रीत जनावरांसारखी वागणूक मिळते, असा गौप्यस्फोट तिने केला आहे.
इंडस्ट्रीत कलाकारांसोबत होतो भेदभाव
"इंडस्ट्रीमध्ये बहुतांश कलाकारांना टाइपकास्ट केलं जातं ज्यामुळे मेकर्सला त्या कलाकारांची सिनेमासाठी निवड करणं सोपं जातं. आणि, अनेक कलाकार या गोष्टीचा स्वीकारही करतात कारण त्यांना त्यांचं पोट भरायचं असतं. आणि, त्यामुळे ते कोणतेही नखरे दाखवू शकत नाही. त्यांना या गोष्टीचा स्वीकार करावाच लागतो. हे नक्कीच त्रासदायक आहे पण हीच सत्य परिस्थिती आहे", असं सुनिता म्हणाली.
पुढे ती म्हणते, "इंडस्ट्रीत मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना सगळ्या सोयीसुविधा दिल्या जातात. त्यांच्या सोईनुसार कॉल टाइम दिला जातो. पण, सपोर्टिंग रोल करणाऱ्यांना फारशा सुविधा दिल्या जात नाहीत.जर तुम्हाला माहितीये की अमूक अमूक कलाकारासोबत तुम्हाला शूट करायचं नाहीये. तर, मग त्यांना नंतर बोलवून घ्या ना. त्यांनी दिवसभर बसवून ठेवण्यात काय अर्थ आहे. यातून तुम्ही फक्त त्यांना कमीपणा दाखवायचा प्रयत्न करता."
सपोर्टिंग रोल करणाऱ्या कलाकारांना मिळते दुय्यम वागणूक
"लीड असलेल्या कलाकारांना खूप पॅम्पर केलं जातं. त्यांना स्वच्छ, प्रशस्त रुम दिल्या जातात. ज्यात फ्रीज, मायक्रोव्हेव, एसी यांसारख्या सोयीसुविधा असतात. पण, आमच्यासारख्या लहान भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना मात्र, लहान, अस्वच्छ रुम दिल्या जातात. या एकाच रुममध्ये ३-४ लोक एकत्र राहतात. बाथरुम स्वच्छ नसतात. बेडशीट खराब असतात हे सगळं पाहून मला खूप वाईट वाटतं. "
जनावरांसारखी वागणूक
"हा सगळा अनुभव घेतल्यानंतर सुनिताने इंडस्ट्रीला रामराम करायचा निर्णय घेतला होता. सोबतच तिने तिचं CINTAA कार्ड सुद्धा कॅन्सल केलं होतं. तुम्ही सपोर्टिंग रोल करता म्हणून तुम्हाला मानसन्मान मिळत नाहीत. किंवा, चांगलं वेतनही मिळत नाहीत. अगदी जनावरांसारखी वागणूक दिली जाते ज्यामुळे खूप मानसिक खच्चीकरण होतं."
दरम्यान, सुनिता लवकरच पंचायत ३ मध्ये झळकणार आहे. यात ती क्रांतीदेवीची भूमिका साकारणार आहे. ही सीरिज येत्या २८ मे रोजी अमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे.