Join us

'पंचायत २' मधील छोट्या भूमिकेने विनोद बनला स्टार, त्याचा प्रवास वाचून बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 1:04 PM

मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे अशोक गेल्या ११ वर्षापासून अभिनयात सक्रिय आहे. बिट्टो बॉस सिनेमापासून त्याने करिअरला सुरूवात केली होती.

'पंचायत २' (Panchayat 2) वेबसीरीज रिलीज होताच सोशल मीडियावर या शोची चांगलीच चर्चा रंगली आहे. मुख्य भूमिकांसोबतच छोट्या छोट्या भूमिकांचीही प्रेक्षकांमध्ये क्रेझ बघायला मिळत आहे. सीरीजमध्ये विनोद नावाची भूमिका भलेही छोटीशी असेल, पण ती फारच लोकप्रिय झाली आहे. विनोदची भूमिका अभिनेता अशोक पाठकने (Ashok Pathak) साकारली आहे. नुकतीच त्याची 'आजतक' ने मुलाखत घेतली. ज्यात त्याने त्याच्या अभिनयाच्या प्रवासाबाबत आणि पंचायतचे किस्से सांगितले. 

मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे अशोक गेल्या ११ वर्षापासून अभिनयात सक्रिय आहे. बिट्टो बॉस सिनेमापासून त्याने करिअरला सुरूवात केली होती. अशोक म्हणाला की, पंचायतच्या विनोदसाठी ऑडिशन फारच घाईघाईत झालं होतं. 'जेव्हा मला कास्टिंगकडून फोन आला आणि सांगण्यात आलं की, छोटी भूमिका आहे. एक दिवसाचं शूटिंग करायचं आहे. तर मी निराश झालो होतो. कारण गेल्या काही वर्षात मी मजूर, ड्रायव्हर किंवा मग सिक्युरिटी गार्ड अशाच भूमिका करत होतो. त्यामुळे विनोदची भूमिकाही तशीच असेल असं वाटलं होतं. दोन-तीनदा ऑडिशन टाळलंही होतं. पण कास्टिंगवाले माझे मित्रच होते. त्यांना नकार देऊ शकलो नाही. घाईत मी एअरपोर्टवरूनच ऑडिशन व्हिडीओ बनवून पाठवला. त्यावेळी मी आर्या २ च्या शूटिंगसाठी जात होतो. त्यांना माझा व्हिडीओ आवडला आणि रोल मिळाला'.

अशोक म्हणाला की, 'मला अपेक्षा नव्हती की, इतका चांगला रिस्पॉन्स मिळेल. लोकांचे मेसेजेस येत आहेत. लोक म्हणाले की, त्यांनी त्याचे सगळे डायलॉग पाठ केले आहेत. मी कधीच विचार केला नव्हता की, माझ्या कामाला इतकं नोटीस केलं जाईल. अनेकांचे मेसेज येत आहेत की, आम्ही तुला पैसे पाठवतो तू टॉयलेट बनवून घे. मी फारच इमोशनल झालोय'.

अशोक म्हणाला की, ११ वर्षाआधी मी मुंबईत आलो होतो. त्यावेळी मुंबईत वादही सुरू होता. बिहारी लोकांना मारून पळवलं जात होतं. मी सुद्धा त्यात अडकलो होतो. एका मित्राच्या घरी तीन दिवस राहिलो. इतका घाबरलो होतो की, मुंबई सोडून जावं वाटत होतं. मित्राच्या सांगण्यावरून एका प्रोमोच्या ऑडिशनला गेलो. तेव्हा माझी पहिली कमाई अडीच हजार होती. तेव्हापासून छोट्या छोट्या भूमिका करून पैसे येत होते. मी एका महिन्यात लखपती बनलो होतो. इतके पैसे मी किंवा माझ्या वडिलांनी कधीच पाहिले नव्हते. चाळीस हजार घेऊन मुंबईत आलो होतो. ते चाळीस हजार आजही संपलेले नाहीत. काही महिन्यांआधी मी मुंबईत एक रूम किचन फ्लॅट खरेदी केला. काम चांगलं सुरू आहे. 

टॅग्स :बॉलिवूडवेबसीरिज