पंकज कपूर यांचा आज म्हणजेच 29 मे ला वाढदिवस असून त्यांचा जन्म पंजाबमधील लुधियानामध्ये 1954 ला झाला. अभिनयाची आवड असलेल्या पंकज कपूर यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून अभिनयाचे शिक्षण घेतले. त्यांनी 1982 साली प्रदर्शित झालेल्या गांधी या चित्रपटाद्वारे त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी मंडी, एक डॉक्टर की मौत, चमेली की शादी, एक रुका हुआ फैसला, मकबूल, फाईडिंग फॅनी यांसारख्या अनेक चित्रपटांत दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत जबान सभांल के, ऑफिस ऑफिस या त्यांच्या मालिकांना देखील लोकांनी डोक्यावर घेतले आहे. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.
पंकज कपूर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांची ओळख निलिमा आझमी यांच्यासोबत झाली होती. निलिमा यांना प्रसिद्ध नर्तिका बनायचे होते आणि त्यासाठी त्या बिरजू महाराज यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेत होत्या. पंकज आणि निलिमा यांची ओळख होताच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि अफेअर सुरू झाल्यानंतर केवळ एकाच वर्षांत म्हणजेच 1975 ला त्यांनी लग्न केले. त्यावेळी पंकज 21 तर निलिमा 16 वर्षांच्या होत्या. लग्नाच्या काहीच वर्षांत त्यांना पहिला मुलगा झाला. पण शाहिद या त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली आणि त्यांनी शाहिद केवळ तीन वर्षांचा असताना घटस्फोट घेतला.
शाहिद आपल्या आईसोबत राहात असला तरी पंकज त्याला अनेक वेळा भेटायला जात असत. याच दरम्यान पंकज नया मौसम या चित्रपटात काम करत होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी सुप्रिया पाठक आणि त्यांची ओळख झाली. त्या दोघांची काहीच दिवसांत चांगली मैत्री झाली.
सुप्रिया पाठक यांचादेखील घटस्फोट झालेला होता. ते दोघे नकळतपणे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण माझा मुलगा हे माझ्यासाठी सगळे काही आहे हे पंकज कपूर यांनी लग्नापूर्वीच सुप्रिया यांना सांगितले होते. सुप्रिया यांनी शाहिदला भेटताच त्याच्यासोबत त्यांची देखील चांगलीच गट्टी जमली. पंकज आणि सुप्रिया यांनी 1988 मध्ये लग्न केले. त्यांना सना, रुहान अशी दोन मुले आहेत.