बॉलिवूडमधील अतिशय प्रभावशाली अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांना मोठ्या पडद्यावर पाहायला खूप मजा येते. त्यांचा सहज पण कसदार अभिनय प्रेक्षकांना प्रभावित करतो. कमी डायलॉग्स असले तरी फक्त हावभावातून ते समोरच्यापर्यंत थेट पोहोचतात. मग ते 'मिर्झापूर' मधील कालीन भैय्या असोत किंवा 'बरेली की बर्फी' मधील क्रिती सेननचे वडील. प्रत्येक भूमिकेत ते जीव ओतून काम करतात. मात्र आता त्यांनी सिनेमांबाबतीत मोठा निर्णय घेतलाय. जास्त चित्रपट करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी म्हणाले, 'जेव्हा आपल्याला खूप भूक लागलेली असते तेव्हा आपण अनेकदा प्रमाणाबाहेर खातो. तसंच माझ्याकडे चांगले प्रोजेक्ट येत गेले आणि मी हो म्हणत गेलो. पण आता मला जरा हळू चालायला हवं. कारण मी आता थकलोय. मी काम कमी केलंय. अशी वेळ होती की मला लक्षातही नव्हतं की मी हा शॉट कधी दिला, कोणत्या फिल्मसाठी दिला.'
ते पुढे म्हणाले,'सध्या जे माझं सुरु आहे ते चांगलं नाही. तुम्ही ३४० दिवस अभिनय करु शकत नाही आणि मी तेच करत होतो. पण आता मला असं करायचं नाही. मला स्क्रीप्ट आवडली आणि मी काम करायला तयार झालो. प्रॉब्लेम हाच आहे की जेव्हा भूकेले असताना आपण जास्त खातो आणि टेबलवर चमचमीत खायला असेल तर प्रमाणाबाहेर खाणं तर साहजिकच आहे. माझ्यासोबतही तेच झालं आहे. माझ्याकडे भरपूर काम आलं आणि मी जास्त केलं.'
पंकज त्रिपाठी यांचा नुकताच 'फुकरे 3' रिलीज झाला आहे . त्याआधी 'OMG 2' रिलीज झाला होता. याशिवाय 'मिर्झापूर 3' ही रिलीज होणार आहे. तर माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या 'मै अटल हूँ' सिनेमातही ते काम करत आहेत.