अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काल (शनिवार) संध्याकाळी त्यांच्या भावोजी आणि बहिणीचा अपघात झाला. या अपघातात भावोजींचा मृत्यू झाला असून बहिणीची तब्येत गंभीर आहे. धनबादमधील जीटी रोडवर त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. सध्या बहिणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत चिंताजनक असल्याने पंकज त्रिपाठी आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
पंकज त्रिपाठी यांच्या भावोजींचं नाव राजेश तिवारी होतं. ते स्वत: कार चालवत होते तर पत्नी सरिता बाजूच्या सीटवर बसल्या होत्या. अपघात नक्की कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र राजेश यांचं जागीच निधन झालं होतं. कुटुंबातील एका व्यक्तीच्या माहितीनुसार, 'अपघात झाल्याचं कळताच आम्ही तातडीने रुग्णालयात पोहोचलो. हे कसं झालं काहीच कळालं नाही.'
राजेश तिवारी हे रेल्वे कर्मचारी होते. चित्तरंजन स्थानकावर त्यांची पोस्टिंग होती. बिहारमधील आपल्या गावावरुन ते परतत होते. मात्र येतानाच जीटी रोडवरील निरसा मार्केटजवळ संध्याकाळी 4 वाजता त्यांचा अपघात झाला. गाडीची गती जास्त होती आणि ती डिव्हायडरला धडकली. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं.
पंकज त्रिपाठी सध्या आपल्या कुटुंबाला आधार देत आहेत. धनबाद हे झारखंडमधील शहर आहे. सध्या पोलिस अपघाताचा तपास करत आहेत. पंकज त्रिपाठींच्या बहिणीचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. गेल्यावर्षीच ऑगस्ट महिन्यात पंकज त्रिपाठींच्या वडिलांचं निधन झालं.