रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) प्रकरणावर सध्या अनेक जण टीका टिप्पणी करत आहेत. कोणी याचा तीव्र विरोध केलाय तर कोणी अशा गोष्टी दुर्लक्ष करायच्या असतात अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या हे प्रकरण चांगलंच तापलं असून रणवीर अलाहाबादियाची चौकशीही होणार आहे. दुसरीकडे समय रैनाच्या सर्व स्टॅण्डअप कॉमेडी शोज रद्द झालेत. अनेक सेलिब्रिटींनीही यावर भाष्य केलं आहे. बॉलिवूडमधील प्रभावी अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यावर काय म्हणतात वाचा.
नुकत्याच एका मुलाखतीत पंकज त्रिपाठींनी डिजीटल जगातील सेन्सॉरशिपवर भाष्य केलं. ते म्हणाले, "तु्मच्यावर कोणतेही निर्बंध नाहीत याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही सार्वजनिक व्यासपीठावर विचित्र गोष्टी कराल. मनोरंजनाच्या नावाखाली काहीही करता कामा नये. नॉनसेन्स गोष्टींमधून अनेकदा आनंद मिळतो पण याचा गर्व वाटण्यासारखं यात काहीच नाही. असं कृत्य केल्यावर अनेकदा तुम्हीच वेडे वाटता."
ते पुढे म्हणाले, "प्रसिद्धी, नाव आणि सोशल मीडियाच्या जगात कधीही काहीही बदलू शकतं. व्हायरल झाल्यावर लोकांचं लक्ष जातं. हे जितकं लवकर येतं तितकंच लवकर जातं. सोशल मीडियावर बोलताना खूप सावधगिरीने बोललं पाहिजे कारण आपल्या बोलण्याचा कोणावर काय परिणाम होईल सांगता येत नाही."
पंकज त्रिपाठी नुकतेच 'स्त्री २' आणि मिर्झापूरच्या नवीन सीझनमध्ये दिसले. आता ते 'मिर्झापूर' सिनेमात झळकणार आहेत.