मनोरंजनसृष्टीत काल उत्साहाचं वातावरण होतं. याचं कारणही खास आहे ते म्हणजे 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. 2021 साली आलेल्या 'मिमी' (Mimi) सिनेमानेही अनेक कॅटेगरीत पुरस्कार पटकावले. मुख्य अभिनेत्री क्रिती सेननने (Kriti Sanon) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. तर पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांना सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अभिनेत्याचे हे यश पाहण्याआधीच अभिनेत्याच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला. पंकज त्रिपाठी वडिलांच्या आठवणीत भावूक झाले आहेत.
पंकज त्रिपाठी यांचे वडील बिहारमधील गोपालगंज या गावात राहायचे. नुकतंच त्यांचं वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालं.यामुळे पंकज त्रिपाठींवर दु:खाचा डोंगर कोसळला. राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यानंतर अभिनेता म्हणाला, 'ही वेळ माझ्यासाठी फार दुर्दैवी आहे. आज बाबूजी असते तर खूप खूश झाले असते. मला पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटला होता. हा राष्ट्रीय पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो. मी आज जो काही आहे त्यांच्यामुळेच आहे.'
ते पुढे म्हणाले,'या क्षणी माझ्याजवळ बोलायला शब्दच नाहीयेत. पण मी सिनेमाच्या टीमसाठी खूप खूश आहे आणि त्यांचा आभारी आहे. क्रितीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला त्यामुळे तिचंही खूप खूप अभिनंदन.'
यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. 'मिमी' सिनेमासाठी क्रिती सेनन आणि 'गंगूबाई काठियावाडी' साठी आलिय भटच्याही नावाची काल घोषणा झाली. तर 'पुष्पा' फेम अभिनेता अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार घोषित झाला आहे.