लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सोशल मीडियावर अपमानास्पद मजकूर पोस्ट केल्याबद्दल पनवेल येथील शेजारी केतन कक्कड यांचे सोशल अकाउंट ब्लॉक करावे किंवा तात्पुरते निलंबित करण्यास दिवाणी न्यायालयाने नकार दिल्यानंतर अभिनेता सलमान खान उच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाने या अपिलावरील निर्णय मंगळवारी राखून ठेवला. गेले दोन महिने या अपिलावरील सुनावणी सुरू होती. अखेर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्या. सी. व्ही. भडंग यांच्या एकलपीठाने निकाल राखून ठेवला.
पनवेल येथील फार्महाऊसवर सलमानने केलेल्या हालचालींबद्दल कक्कड यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केल्याने सलमानने त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. बदनामीकारक व्हिडिओ हटविण्याचे आदेश द्यावेत. तसेच त्यांना विधाने करण्यापासून रोखावे, अशी मागणी सलमानने न्यायालयाकडे केली. मात्र, ही मागणी मान्य करण्यास दिवाणी न्यायालयाने नकार दिल्याने सलमानने उच्च न्यायालयात धाव घेतली.
‘लाखोंनी हा व्हिडिओ पाहिला आणि सलमानविरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलमान दाऊद टोळीचा सदस्य असल्याचा आरोपही कक्कड यांनी केला. सलमानच्या फार्महाऊसवर ड्रग्ज, अवयव आणि मुलांची तस्करी करत असल्याचे गंभीर आरोप केल्याचे मानहानी दाव्यात म्हटले आहे. कक्कड यांचे सोशल मीडिया अकाउंट निलंबित करावे व त्यांना बदनामीकारक विधाने करण्यापासून अडविण्यात यावे, अशी अंतरिम मागणी सलमान खानने याचिकेत केली आहे.