९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मयुरी कांगो आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पापा कहते है या चित्रपटातील घर से निकलते ही... हे गाणे प्रचंड गाजले होते. या गाण्यात आपल्याला जुगल हंसराज आणि मयुरी कांगो यांना पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील मयुरीच्या अभिनयाचे कौतुक झाले नसले तरी तिच्या लूक्सची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. गेल्या काही वर्षांपासून मयुरी चित्रपटापासून दूर आहे. पण आता ती कुठे आहे आणि काय काम करत आहे हे तुम्हाला कळल्यानंतर तुम्हाला नक्कीच आर्श्चयाचा धक्का बसणार आहे. मयुरी बॉलिवूडमुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्ध झाली आहे. मयुरी कांगो ही सध्या गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड बनली आहे. यापूर्वी मयुरी परफॉर्मिक्स डॉट रिझल्ट्रीक्स कंपनीच्या पब्लिसीस ग्रुपची मॅनेजिंग डायरेक्टर होती. ही कंपनी गुरगावमधील होती.
www.afaqs.com या वेबसाईटला मयुरी कांगोने नुकतेच तिच्या व्यावसायिक वाटचालीविषयी सांगितले आहे. मयुरीने महेश भट्टच्या 'पापा कहते है चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि मयुरी रातोरात प्रसिद्धी झोतात आली. तिने गेल्या काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, मी एकूण १६ चित्रपट केले होते पण त्यातले अर्ध्याहून अधिक प्रदर्शित झालेच नाही, १९९९ हे वर्ष अभिनेत्रीसाठी फारसे काही चांगले नव्हते. मला चित्रपटात झाडाच्या मागे पुढे डान्स करायला सांगायचे. मग मी पटकथा लिखाण आणि डॉक्युमेंटरीवर लक्षकेंद्रित केले. नंतर २००० मध्ये मी टीव्हीकडे वळली आणि काही वर्षानंतर लग्न करून मी यूएसला शिफ्ट झाले.
अभिनय सोडल्यानंतर न्यूयॉर्कमधील ३६० आय या डिजीटल एजन्सीमध्ये ती नोकरी करू लागली. त्यानंतर त्याच कंपनीत तिला मीडिया मॅनेजर या पदावर बढती मिळाली आणि आता तर ती गुगल इंडियामध्ये कार्यरत आहे. मयुरीने केलेल्या चित्रपटांच्या यादीत 'होगी प्यार की जीत','पापा कहते है', 'जितेंगे हम' हे चित्रपट नक्कीच लक्षात राहण्यासारखे आहेत.