Pathaan Controversy : शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) आगामी सिनेमा ‘पठाण’ने (Pathaan) रिलीजआधीच वाद ओढवून घेतला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) हे गाणं रिलीज झालं आणि यावरून वातावरण तापलं. या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीला पाहून अनेक लोक खवळले. हिंदू संघटना या गाण्याविरोधात रस्त्यावर उतरल्या. संसदेतही याचे पडसाद उमटले. अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य यांनी या वादावर जळजळीत प्रतिक्रिया दिली. आता तर त्यांनी कहरच केला. होय, त्यांनी चक्क शाहरूखचं तेरावंच केलं.
याआधी परमहंस आचार्य यांनी शाहरूखला जिवंत जाळण्याची भाषा केली होती. पठाण चित्रपटात आमच्या भगव्या रंगाचा अपमान केला आहे. आपल्या सनातन धर्माचे लोक या बाबत सातत्याने विरोध करत आहेत. हा सिनेमा म्हणजे जिहाद आहे. हे एक षडयंत्र आहे. त्यामुळे आज आम्ही शाहरुख खानचे पोस्टर जाळले. जर मला जिहादी शाहरुख खान मिळाला तर मी त्याला जिवंत जाळून टाकेन. ज्यादिवशी शाहरूख खान मिळेल, त्यादिवशी त्यालाच जिवंत जाळेल. मी त्याला शोधतोय. तो जिहादी भेटला तर मी त्याची चामडी सोलून काढेन. माझ्या आधी कुणी त्याला शोधलं आणि जाळलं तर त्याचा खटला मी लढेन. जो कोणी आमच्या सनातनाचा अपमान करेल, त्याला आम्ही सोडणार नाही, असा धमकीवजा इशाराच संत जगतगुरू परमहंस आचार्य यांनी दिला होता. आता त्यांनी शाहरूखचं तेरावं केलं.सोमवारी आपल्या काही समर्थकांसह त्यांनी शाहरूखचं तेरावं केलं. त्यासाठीचे काही विधी त्यांनी पार पाडले. इतकं करून ते थांबले नाहीत तर पठाण हा सिनेमा ज्या चित्रपटगृहात दिसेल, ते चित्रपटगृह फुंकून टाका, असं आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केलं.
आम्ही 13 दिवसांपूर्वी शाहरुख खानचा पुतळा जाळला होता, आज 13 दिवस पूर्ण झाल्यामुळे आम्ही शाहरुख खानंचं तेरावं केलं आहे. हा तोच शाहरुख आहे जो अमेरिकेच्या विमानतळावर विवस्त्र झाला होता. कारण आजही तो अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या संशयितांच्या यादीत आहे. येथे काही लोक शाहरुखला किंग म्हणतात, किंग विंग काही नाही. हा जिहादी चित्रपट आहे. तो जिहादींचा म्होरक्या आहे, त्याच्यामुळे रोज लाखो मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत. काही सुटकेसमध्ये सापडत आहेत, काही जिवंत जाळल्या जात आहेत, काही 35 तुकडे, काही 100 तुकडे आहेत. या सर्वांचा तो प्रमुख आहे, त्याने देशभर जिहाद पसरवला आहे. म्हणूनच आज आम्ही त्याचं तेरावं केलं आहे, जिहाद संपला पाहिजे, असं ते म्हणाले.