'हेराफेरी', 'वेलकम', 'चुपचुपके','भागमभाग', 'हलचल', 'नायक' अशा कितीतरी सुपरहिट सिनेमात झळकलेला अभिनेता म्हणजे परेश रावल. कधी विनोदी, तर कधी ग्रे शेड भूमिका साकारुन त्यांनी तुफान लोकप्रियता मिळवली. परेश रावल आज त्यांचा ६८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्याशी निगडीत अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत. यामध्येच करिअरच्या सुरुवातीला परेश रावल यांची परिस्थिती इतकी बिकट होती की बऱ्याचदा ते त्यांच्या गर्लफ्रेंडकडून पैसे उधार घ्यायचे.
परेश रावल यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये २४० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी अमाप संपत्ती, यश मिळवलं आहे. परंतु, एक काळ असा होता ज्यावेळी त्यांना बराच स्ट्रगल करावा लागला. एका कार्यक्रमात त्यांनी स्वत: त्यांच्या संघर्ष काळातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलत असतांना मी माझ्या गर्लफ्रेंडकडून पैसे घ्यायचो, असं ते म्हणाले.
"त्यावेळी आमच्या कुटुंबात मुलांना पॉकेट मनी देण्याची काही संकल्पना नव्हती. त्यामुळे स्वखर्चासाठी मी बँकेत नोकरी करायचो. दीड महिन्यांसाठी मला ही नोकरी मिळाली होती. पण, मी तीन दिवसांमध्येच ती सोडली. मात्र, हातातून नोकरी गेल्यामुळे स्वखर्च करणं कठीण झालं होतं. त्यावेळी माझी गर्लफ्रेंड संपत स्वरुप मला आर्थिक मदत करायची. संपत मला पैसे द्यायचे", असं परेश रावल म्हणाले.
दरम्यान, परेश रावल यांनी संपत स्वरुप यांच्यासोबतच लग्न केलं. संपत स्वरुपदेखील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर १९७९ च्या मिस इंडियाचा खिताबही त्यांनी पटकावला आहे.