Paresh Rawal, Voting in Mumbai Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा आज पाचवा टप्पा सुरू आहे. देशभरात मतदान प्रक्रिया सुरु असून महाराष्ट्रात आज शेवटचा टप्पा आहे. आतापर्यंत कोणत्याही टप्प्यात मतदान 70 टक्क्यांच्या वर झालेले नाही. तीव्र उकाडा, ऊन तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस यामुळे मतदानाचा टक्का घसरल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील अनेक मतदारसंघात निवडणूक बूथवर मशिन्समधील बिघाडामुळे मतदान संथगतीने होताना दिसत आहे. मतदार मतदानासाठी उतरले असले तरीही बऱ्याच ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. असे असताना मतदान न करणाऱ्यांना शिक्षा केली जायला हवी, असे मत बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत एका मतदान केंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी लवकर मतदान करणाऱ्यांमध्ये परेश रावल यांचाही समावेश होता. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावायलाच हवा, असे ते म्हणाले. याच वेळी मतदान न करणाऱ्यांसोबत काय केले जावे, याबद्दलही त्याने वक्तव्य केले.
"प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. कारण नंतर सरकारने हे केले नाही, सरकारने ते केले नाही असे म्हणण्यात काहीच अर्थ नसतो. तुम्हाला तुमचे सरकार, तुमचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत तुम्ही मतदान केले नाही, तर तुमच्या भविष्यातील परिस्थितीला सरकार नव्हे तर तुम्ही स्वत:च जबाबदार असाल. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा. जे लोक मतदानासाठी येत नाहीत, त्यांना शिक्षा देण्याची किंवा त्यांच्यावरील कर वाढवण्यासारख्या काही तरतुदी असायला हव्यात", अशी रोखठोक भूमिका परेश रावल यांनी मांडली.