हेराफेरी, ओह माय गॉड यांसारखे यादगार सिनेमे देणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी आज बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. अभिनय ते राजकारण असा प्रवास करणारे परेश यांना प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग आहे. त्यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. त्यांच्या अभिनयासाठी आजवर त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
२०० पेक्षा अधिक चित्रपट आणि विनोदी ते खलनायक अशा वेगवेगळ्या भूमिका साकारणारे परेश यांना खरी ओळख मिळाली ती विनोदी भूमिकांमुळे. अक्षय कुमार आणि त्यांची जोडी कमालीची गाजली. या जोडीने जवळपास २३ सिनेमे एकत्र केलेत. परेश रावल यांनी अनेक हिंदी चित्रपटात, गुजराती चित्रपटात त्याचसोबत गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे. परेश रावल यांच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. ते आता मराठी नाट्यसृष्टीकडे वळले असून त्यांच्या नाटकाचा पहिला प्रयोग लवकरच संपन्न होणार आहे. पण या नाटकात ते काम करणार नसून या नाटकाच्या निर्मितीची धुरा त्यांनी सांभाळली आहे.
महारथी हे नाटक महारथी या मुळ गुजराती नाटकाचे मराठीत रूपांतरण असणार आहे. या नाटकाची परेश रावल निर्मिती करणार असून या नाटकात सचित पाटील मुख्य भूमिकेत आहे. सचितने आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. त्याची राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. आता तो महारथी या नाटकाद्वारे 19 वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करत आहे. या नाटकाची निर्मिती बदाम राजा प्रॉडक्शन करणार असून या नाटकाचा पहिला प्रयोग 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनी होणार आहे.
चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या एका तरुणाची भूमिका सचित या नाटकात साकारत असून हा नायक अभिनयक्षेत्रात करियर करण्यासाठी इंदौरहून मुंबईला आला आहे. मुंबईत आल्यावर तो एका निर्मात्याकडे नोकरी करू लागतो. या नायकाची महत्त्वाकांक्षा आणि त्या निर्मात्याच्या बंगल्यातले गूढ उलगडणारे महारथी हे नाटक आहे.