राघव चड्ढा (Raghav Chaddha) आणि परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांनी २४ सप्टेंबर रोजी लग्नगाठ बांधून आपल्या आयुष्याची सुंदर सुरुवात केली. उदयपूरच्या 'द लीला पॅलेस'मध्ये दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता चर्चा आहे की लग्नानंतर परिणीती आणि राघव लवकरच त्यांच्या जवळच्या लोकांसाठी रिसेप्शन पार्टी आयोजित करणार आहेत. दरम्यान, तिच्या रिसेप्शन पार्टीची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर लीक झाली असून ती व्हायरल होत आहे. या कार्डनुसार राघव आणि परिणीतीची रिसेप्शन पार्टी ३० सप्टेंबरला चंदीगडच्या ताज हॉटेलमध्ये आयोजित केली जाणार आहे.
यानंतर हे कपल दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शनही देणार आहे. न्यूज १८ च्या वृत्तानुसार, लग्नानंतर हे जोडपे दिल्ली आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी रिसेप्शन पार्टी आयोजित करणार आहेत. दिल्लीतील रिसेप्शनला राजकीय जगतातील अनेक दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत, तर मुंबईतील पार्टीत बॉलिवूड स्टार्स पाहायला मिळणार आहेत.
लग्नानंतर परिणीती काल दिल्लीत तिच्या सासरच्या घरी पोहोचली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, तो व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये परिणिती आपल्या पतीसोबत दिसत होती. भांगेत सिंदूर गळ्यात मंगळसूत्र अशा गेटअपमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.