बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा तीन महिन्यांपूर्वी राजस्थानमध्ये 24 सप्टेंबरला भव्य लग्न सोहळा पार पडला. लग्नाला काही दिवसच उलटले असून अभिनेत्री लगेच कामावर परतली आहे. राघव हे राजकारणातील मोठं नाव आहे. ते आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार आहेत. यातच आता परिणीतीही राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
परिणीतीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तिने नुकतेच गुजरातच्या वडोदरामध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिला भविष्यात कधी राजकारणात येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तिने उत्तर दिलं, 'राघवला बॉलिवूडबद्दल काहीच माहिती नाही आणि मला राजकारणाची कल्पनाही नाही'.
पुढे ती म्हणाली, 'त्यामुळे तुम्ही मला राजकारणात येताना पाहाल असं मला वाटत नाही. आम्ही दोघे सार्वजनिक जीवनात आहोत, तरीही संपूर्ण देशातून इतके प्रेम मिळेल याची कल्पना आम्हाला नव्हती. मला वाटते की जर तुम्ही योग्य व्यक्तीसोबत असाल तर वैवाहिक जीवन खूप छान आहे'.
परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ‘मिशन रानीगंज’ चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत झळकली होती. लवकरच परिणीती ‘चमकीला’ या चित्रपटात दिसणार आहे. 'चमकिला'मध्ये परिणीती ही दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे. दिलजीत अमर सिंग 'चमकिला'ची भूमिका साकारणार आहे, तर परिणीती त्याच्या पत्नी अमरजोतची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.