Join us

परिणिती चोप्रा म्हणतेय एमिली ब्लंट आणि तिच्या परफॉर्मन्सची होणार तुलना

By अजय परचुरे | Published: June 17, 2019 11:08 AM

हॉलीवूडच्या द गर्ल ऑन द ट्रेन या बड्या थ्रिलर चित्रपटाच्या रिमेकमध्ये परिणिती काम करीत असून मूळ चित्रपटात एमिली ब्लंटने ही भूमिका साकारली आहे.

ठळक मुद्दे रिमेक करताना मूळ चित्रपटाशी होणारी तुलना थांबवण्यासाठी कलाकार म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही.

प्रत्येक पात्रात शिरून ते पात्र आपलेसे करणारी अभिनेत्री अशी परिणिती चोप्राची ओळख आहे. इशकजादे आणि त्यानंतर हसी तो फसी आणि अन्य चित्रपटांत परिणितीने  उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला आहे. सध्या हॉलीवूडच्या द गर्ल ऑन द ट्रेन या बड्या थ्रिलर चित्रपटाच्या रिमेकमध्ये परिणिती काम करीत असून मूळ चित्रपटात एमिली ब्लंट हिने साकारलेली भूमिका या रिमेकमध्ये परिणिती साकारणार आहे. या जुन्या हॉलीवूड स्टारशी आता परिणितीची तूलना लोकांनी केली तरीही परिणितीला त्याबाबत काहीही तक्रार नाही. द गर्ल ऑन द ट्रेनमधील एमिली ब्लंटच्या परफॉर्मन्सने मी अवाक झाले होते. तिने स्क्रीनवर इतक्या ताकदीनिशी साकारलेली भूमिका वठवण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. या चित्रपटात झगडणाऱ्या तरुण मुलीची भूमिका साकारताना तिने अभिनेत्री म्हणून जी ताकद लावली आहे, ती नक्कीच कौतुकास्पद आहे. आपल्या आवडत्या चित्रपटाचा रिमेक जेव्हा एखादा कलाकार साकारतो, तेव्हा तो त्याहीपेक्षा अधिक चांगला नसला तरीही  मूळ चित्रपटाप्रमाणेच असावा अशी अपेक्षा असते. म्हणूनच, मूळ चित्रपटाशी व त्या कलाकारांशी आमची आणि आमच्या रिमेकची तुलना होणार आहे, याची जाणीव परिणिती चोप्राला आहे.

परिणीतीच्या म्हणण्यानुसार रिमेक करताना मूळ चित्रपटाशी होणारी तुलना थांबवण्यासाठी कलाकार म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही. पण आपल्या चांगल्या कामाने ही चर्चा समांतर नक्कीच करू शकतो. मूळ चित्रपटाला लोकांचा जो प्रतिसाद मिळाला, तसाच प्रतिसाद आम्हालाही मिळेल, अशी मला आशा आहे. तूलनेचा मी जास्त विचार करीत नाही कारण, भारतीय प्रेक्षकांसाठी हे पात्र  अधिकाधिक जिवंत करण्यासाठी मला माझे सर्वोत्तम प्रयत्न करायचे आहेत.२०१५ साली प्रकाशित झालेल्या पॉला हॉकिन्स यांच्या पुस्तकावर आधारित असलेला हा चित्रपट एका घटस्फोटित महिलेची कथा सांगतो. एका हरवलेल्या माणसाच्या चौकशीमध्ये ही महिला अडकते आणि त्यानंतर तिचे आयुष्य कलाटणी घेते. मूळ चित्रपटात उत्तम काम करून प्रेरणा दिल्याबद्दल परिणितीला एमिलीचे कौतुक वाटतं.

 

एमिलीची कामगिरी ही परिणीतीसाठी  उत्कृष्ट रेफरन्स पॉईण्ट आहे. तिने हे पात्र कागदावरून जिवंत केले आहे आणि फारच हुशारीने हे काम केले आहे.  तिच्यासारखे उत्तम काम करत माझे स्वत:चे काहीतरी या पात्रात ओतण्याचा प्रयत्न करणार आहे. एक अभिनेत्री म्हणून, कायमच आव्हानात्मक भूमिका साकारण्याची माझी धडपड असते. माझ्या तील अभिनय वैविध्य दाखवून देण्याची संधी या भूमिकेने मला दिली आहे. एमिली आणि मी आमच्या स्वतंत्र गुणधर्मांतून एकच पात्र कसे साकारले आहे, हे पाहण्यात प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता वाटेल, अशी खात्री  परिणीतीला वाटते आहे.