Paris Olympics 2024: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचली होती. क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा ५-० असा पराभव करत तिने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु, आता मात्र तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. वजन ५० किलोपेक्षा जास्त भरल्याने विनेशला अपात्र घोषित करण्यात आले. त्यामुळे आता तिला अंतिम सामना खेळविण्यात येणार नसून याबरोबरच भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्नही भंग पावलं आहे.
विनेश फोगाटला अपात्र घोषित केल्यानंतर सर्वच स्तरातून तिला पाठिंबा दिला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनीही तिच्यासाठी पोस्ट केल्या आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिनेदेखील विनेशसाठी पोस्ट केली आहे.
प्रिती झिंटाची विनेश फोगाटसाठी पोस्ट
प्रिय विनेश फोगाट,
तुला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी तू लखलखणारं सोनं आहेस. तू विजेत्यांची विजेती आणि भारतातील प्रत्येक स्त्रीसाठी 'हिरो' आहेस.
तुझ्याबाबतीत ज्याप्रकारे गोष्टी घडल्या, त्यासाठी वाईट वाटतंय. स्ट्राँग राहा आणि पुन्हा हिंमतीने उभी राहा. आयुष्य नेहमीच न्याय देते असं नाही...कठीण काळ टिकत नाही. पण, कठीण लोक टिकतात. मला आता तुला मिठी माराविशी वाटतेय आणि तुला सांगांवसं वाटतंय की आम्हाला तुझा गर्व आहे.
ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात फायनल खेळणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनली होती. विनेशनं पहिल्यांदाच कुस्तीत ५० किलो वजनी गटात आव्हान दिलं होतं. त्याआधी ती ५३ किलो वजनी गटात खेळत होती. आज तिचा अंतिम सामना होणार होता.
कॉमनवेल्थमध्ये ३ गोल्ड मेडलची मानकरी
विनेश फोगाटने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सलग ३ गोल्ड मेडल जिंकले होते. २०१४ ग्लास्गो, २०१८ कोस्ट आणि २०२२ बर्मिंघम येथील स्पर्धेत गोल्ड पदक जिंकले होते. त्याशिवाय विनेशनं २०१८ मध्ये जकार्ता येथील एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर नाव कोरलं होतं. एशियन चॅम्पियनशिप २०२१ मध्येही विनेश फोगाटनं गोल्ड जिंकत सुवर्ण कामगिरी केली. त्याशिवाय एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिने ३ सिल्व्हर मेडलही जिंकले आहे.