Pathaan Day ! बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'पठाण'ने ५०० कोटी रुपयांची कमाई करत बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला पठाण ३ आठवडे उलटून गेले तरी तुफान कमाई करत आहे. याच निमित्ताने आज शुक्रवारी सर्वत्र 'पठाण' डे साजरा करण्यात येत आहे. केवळ ११० रुपयांत थिएटरमध्ये पठाण बघता येणार आहे.
'पठाण' रिलीज झाला आणि बॉलिवूडचे बुडते जहाज पुन्हा वर आले. शाहरुख खानचा 'पठाण' रिलीज होणार म्हणल्यावर देशातील अनेक चित्रपटगृहांनाही संजीवनीच मिळाली. कित्येक सिंगल स्क्रीन थिएटर पुन्हा सुरु झाले. पठाणची रेकॉर्डब्रेक कमाई पाहता आज १७ फेब्रुवारी रोजी सर्व थिएटर चालकांनी 'पठाण डे' साजरा करण्याचे ठरवले आहे. पीव्हीआर, सिनेपोलिस, आयनॉक्स यासारख्या ठिकाणी तिकिटांचे दर कमी करण्यात आले आहेत. आज पठाणचे तिकीट केवळ ११० रुपयांना मिळत आहे. पठाणने ५०० कोटींचा गल्ला जमवल्याच्या आनंदात ही ऑफर देण्यात आली आहे.
शुक्रवार म्हणलं की सिनेप्रेमींची पावलं आपोआप थिएटरकडे वळतात.ज्यांनी अद्याप पठाण बघितलेला नाही त्यांना स्वस्तात सिनेमा पाहायची ही उत्तम संधी आहे. तर ज्यांना पठाण आवडला ते पुन्हा एकदा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करु शकतात. त्यामुळे आता पठाणच्या कमाईत आणखी वाढ होण्याचीही शक्यता आहे.500 कोटी क्लबमध्ये सामील होणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. यातच आता पठाणची टक्कर बाहुबली 2 सोबत आहे. ज्याचे कलेक्शन 511 कोटी रुपये एवढे आहे.