गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. अगदी अलीकडे पायलने महान समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त मत मांडत सती प्रथेचे समर्थन केले होते. आता पायलने थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकली आहे.
तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवाजी महाराज हे मुळचे क्षत्रिय नसून ते शुद्र जातीत जन्माला आले होते, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. शिवाय मराठा आरक्षणावरही आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिले? असा थेट सवालही तिने केला आहे.
या तिच्या पोस्टमुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. आता तिने फेसबुक अकाऊंटला एक व्हिडिओ पोस्ट करत याबद्दल माफी मागितली आहे. तिने माफी मागताना म्हटले आहे की, मी हात जोडून सगळ्यांची माफी मागते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मी काही गोष्टी वाचल्या होत्या आणि त्यामुळेच माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले होते. मी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रचंड मानते. त्यांचे पूजन करते. पण मला त्यांच्या संबंधित एक प्रश्न पडला होता. त्याचेच उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला. पण यानंतर माझ्या लक्षात आले की, सोशल मीडियावर केवळ त्वेष निर्माण करणारी लोकं आहेत. पण तरीही मी हात जोडून माफी मागते. पण ही माहिती योग्य असती तर सनातन धर्म किती महान आहे हे सगळ्यांना कळले असते. पण माझ्या प्रश्नांचे उत्तर देण्यापेक्षा माझ्यावर खूप वाईट पद्धतीने टीका करण्यात आली. आपल्याकडे एखादी व्यक्ती सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करत असेल तर त्याला मदत केली जात नाही. मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अभ्यास करण्याचा, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्यातून भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये असेच मला जाणवले.
काही दिवसांपूर्वी पायलने नथुराम गोडसेची पाठराखण करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी आहे, या सुपरस्टार कमल हासन यांच्या वक्तव्याचा निषेध करणारी ही पोस्ट होती.