Join us

संतापजनक! पायल रोहतगी पुन्हा बरळली, राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त ट्वीट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 10:29 AM

सतीप्रथा निर्मूलनातील अग्रणी थोर समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांच्याविषयी अभिनेत्री पायल रोहतगी हिने वादग्रस्त आणि संतापजनक ट्वीट केले आहे.

ठळक मुद्देपायल तिच्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असते. अशी विधाने करून पायल भाजपाचे तिकिट मिळवू इच्छिते, असा आरोपही तिच्यावर होत आला आहे.

अभिनेत्री पायल रोहतगी पुन्हा बरळली. होय, गेल्या काही दिवसांपासून पायल तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. ताज्या ट्विटमध्ये पायलने थेट महान समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त मत मांडले. राजा राममोहन राय हे इंग्रजांचे ‘चमचे’ म्हटले. केवळ इतकेच नाही तर सती प्रथेचे समर्थनही केले.ट्विटरवरील इंडियन हिस्टरी पिक्स नावाच्या एका अकाउंटवरून 22 मे रोजी राजा राम मोहन रॉय यांचा एक फोटो शेअर झाला होता. त्यात सतिप्रथेचे कट्टर विरोधक आणि समाज सुधारक असे कॅप्शन देण्यात आले होते. पायल रोहतगी हिने हे ट्विट शेअर करत पायलने राजा राममोहन रॉय यांच्यावर टीका केली.

 ‘नाही, ते इंग्रजांचे चमचे होते. सती प्रथेला बदनाम करण्यासाठी इंग्रजांनी राजा राममोहन रॉय यांचा वापर केला. सती परंपरा देशात कुठेच सक्तीची नव्हती. मोगल शासकांद्वारे हिंदू महिलांना वेश्यावृत्ती ढकलण्यापासून वाचवण्यासाठी या प्रथेचा जन्म झाला. महिला स्वत:च्या मर्जीने सती जात. सती जाणे कुठल्याही प्रकारे चुकीची वा प्रतिगामी प्रथा नव्हती,’असे ट्विट पायलने केले आहे.

पायलच्या पोस्टनंतर साहजिकच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेकांनी पायलला फैलावर घेतले. एका युजरने तर थेट मुंबई पोलिसांना टॅग करत, पायलचे हे विधान थेटपणे गुन्हा असून याप्रकरणी तिच्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्य एका युजरने पायलला ट्रोल करत इंग्रजी पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला आहे.

पायल तिच्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असते. अशी विधाने करून पायल भाजपाचे तिकिट मिळवू इच्छिते, असा आरोपही तिच्यावर होत आला आहे. अलीकडे पायलने मुस्लिमांना लक्ष्य करणारे ट्विट केले होते. भारतात मुस्लिमांची संख्या २० कोटी झाली आहे. त्यामुळे देशात मुस्लिमांना अल्पसंख्यांकांचा दर्जा मिळू नाही. हा देशातील बौद्ध, पारसी अशा अल्पसंख्यांक धर्मांवरचा अन्याय ठरेल. सेक्युलर भारतात मुस्लिम आता अल्पसंख्यांक राहिलेले नाहीत, असे तिने म्हटले होते. याशिवाय भारताची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी आता एक कायदा व्हायला हवा, असे ट्विटही तिने अलीकडे केले होते.

टॅग्स :पायल रोहतगी