जान्हवी कपूरची ही अदा तुम्हालाही ‘चांदनी’ची आठवण करुन देईल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2018 9:51 AM
बॉलिवूडची चांदनी श्रीदेवी आणि त्यांची लेक जान्हवी कपूर यांच्यातील नातं हे कोणत्याही मायलेकीप्रमाणेच होतं. दोघींचा एकमेकींवर खूप जीव होता. ...
बॉलिवूडची चांदनी श्रीदेवी आणि त्यांची लेक जान्हवी कपूर यांच्यातील नातं हे कोणत्याही मायलेकीप्रमाणेच होतं. दोघींचा एकमेकींवर खूप जीव होता. जान्हवीच्या बालपणापासूनच्या गोष्टी ते बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याच्या निर्णयात श्रीदेवी यांचा सिंहाचा वाटा होता. पापा बोनी कपूर यांच्यापेक्षा जान्हवीचे आपल्या आईशी जास्त ट्युनिंग होतं. मात्र श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनाने जान्हवीसह संपूर्ण कपूर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.श्रीदेवी यांच्या निधनानंतर आता हळूहळू का होईना जान्हवी आणि खुशी या धक्क्यातून सावरत आहेत.मात्र बोनी कपूर अजूनही पत्नीच्या निधनाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत.अशावेळी जान्हवीच आपल्या वडिलांनी या धक्क्यातून बाहेर पडावं यासाठी प्रयत्न करते आहे.श्रीदेवी यांची बोनी कपूर यांना कमी जाणवू नये याचा ती प्रयत्न करते.याचीच प्रचिती ६५व्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात आली. याच सोहळ्यात जान्हवी श्रीदेवी यांच्याप्रमाणे आपल्या वडिलांची काळजी घेत असल्याचा एक फोटो समोर आला आहे.या फोटोत जान्हवी आपल्या जवळ असणाऱ्या रुमालाने वडिलांच्या डोक्यावरील घाम पुसत असल्याचे पाहायला मिळत आहे.जान्हवीची ही अदा श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यातील अशाच मिळत्याजुळत्या हळुवार क्षणाची आठवण करुन देणारी आहे. एका जुन्या फोटोत श्रीदेवीसुद्धा बोनी कपूर यांच्या डोक्यावरील घाम पुसत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून रसिकांना आपल्या लाडक्या चांदनीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. ६५व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात श्रीदेवी यांना मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'मॉम' सिनेमातील भूमिकेसाठी श्रीदेवी यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला.या सोहळ्याप्रसंगी जान्हवीने आपल्या आईच्या खास साडी कलेक्शनमधील साडी परिधान केली होती. हीच साडी श्रीदेवी यांनी २०१२ साली टॉलीवुड अभिनेता रामचरनच्या लग्नात परिधान केली होती. दरम्यान, पुरस्कार स्वीकारताना बोनी कपूर खूपच भावनिक झाल्याचे दिसून आले.त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. यावेळी बोनी कपूर यांनी म्हटले की, ‘आमच्या परिवारासाठी हा एक गर्वाचा क्षण आहे.संपूर्ण परिवार आणि मी श्रीला खूप मिस करत आहोत.श्री आमच्यासोबत नाही, परंतु ती जिथे असेल तिथे खूप आनंदी असेल. श्रीदेवी यांच्या आठवणी सांगताना बोनी कपूरला अश्रू अनावर झाले होते. यावेळी दोन्ही मुली जान्हवी आणि खुशीनेही आईचे स्मरण केले. १९८९ मध्ये आलेल्या ‘चांदनी’ या श्रीदेवीच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. श्रीदेवी यांनी बॉलिवूडसह विविध भाषांमधील ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. श्रीदेवी यांनी ‘मॉम’ या चित्रपटात एका अशा आईची भूमिका साकारली होती. जिची मुलगी बलात्कार पीडित होती. तिला न्याय मिळवून देण्यासाठी एका आईचा लढा चित्रपटात दाखविण्यात आला होता.