कोरोना काळात हजारो स्थलांतरित मजुरांसाठी दिवसरात्र खपणारा अभिनेता सोनू सूद अद्यापही थकलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या माध्यमातून तो लोकांना मदत करतोय. कधी कोणाचा उपचार करतोय तर कधी मुलांच्या शाळेची फी भरतोय. सोनू सूद आपल्या हाकेला ‘ओ’ देईल, याची लोकांना इतकी खात्री झालीय की लोक लहानमोठ्या समस्या, अडचणी त्याला सांगतात. कधी कधी तर लोक सोनू सूदकडे अशा अशा मागणी करतात की, सोनूही कपाळावर हात मारून घेतो.होय, आता एका गावातील काही ग्रामस्थांनी सोनूकडे कोणती मदत मागावी तर गावातील वानरांचा बंदोबस्त करण्याची. होय, बासु गुप्ता नामक एका ट्विटर युजरने सोनूकडे गावाची कैफियत मांडली.
‘सोनू सूद सर, आमच्या गावात एका वानराने उच्छाद मांडला आहे. त्याच्या हल्ल्यात डझनावर लोक जखमी झाले आहेत. या वानराला गावातून बाहेर दूर जंगलात नेऊन सोडावे, अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो,’ अशा शब्दांत बासु गुप्ताने आपली अडचण सांगितले. आपल्या पोस्टसोबत त्याने गावक-यांचा फोटोही जोडला.सोनू सूदच्या नजरेतून हे ट्विट सुटले नाही. हे ट्विट पाहिल्यानंतर अपेक्षेनुसार, लगेच सोनूने त्यावर उत्तर दिले. ‘बस अब बंदर पकडना ही बाकी रह गया था दोस्त, असे मजेशीर उत्तर त्याने दिले. इतक्यावरच सोनू थांबला नाही तर त्याने या गावक-यांना निराश न करता त्यांनाही मदतीचे आश्वासन दिले. पता भेज, यह भी करके देख लेते हैं, असे त्याने लिहिले.सोनू सूदने आत्तापर्यंत गरिब शेतक-यांना ट्रॅक्टर पाठवण्यापासून अनाथ मुलांना आश्रय देणे, शस्त्रक्रियेसाठी मदत करणे, घर बांधून देण्यापर्यंत अनेक प्रकारे लोकांची मदत केली आहे.वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सोनूने अलीकडे ‘किसान’ हा सिनेमा साईन केला आहे. यात तो लीड भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा ई निवास दिग्दर्शित करणार आहे.