बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच निधन होऊन आज बराच काळ लोटला आहे. मात्र, आजही त्याला विसरणं अनेकांना शक्य नाही. सुशांतने त्याच्या करकिर्दीत काही मोजके चित्रपट केले. मात्र, त्याचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला. त्यामुळे आजही सुशांतचं नाव लोकप्रिय कलाकारांच्या यादीत घेतलं जातं. सुशांतच्या बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या काही चित्रपटांच्या यादीत 'केदारनाथ' (Kedarnath) या चित्रपटाचं आवर्जुन नाव घेतलं जात. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर (Abhishek Kapoor) यांनी केलं होतं. अलिकडेच अभिषेक यांनी सुशांतविषयी त्यांचं मत व्यक्त केलं असून एक मोठी खंत व्यक्त केली आहे. 'केदारनाथ'मध्ये सुशांत सिंह राजपूतला घेतल्यामुळे कोणताही मोठा व्यक्ती या चित्रपटात पैसे गुंतवत नव्हता. त्यांच्या मते, सुशांत स्टार नव्हता', असं अभिषेक यांनी 'इंडिया टुडे'च्या मुलाखतीत सांगितलं.
"यात काहीच विचित्र नव्हतं. सुशांत कोणी स्टार नाही असं म्हणत अनेकांनी केदारनाथ सोडला होता.मी या चित्रपटासाठी सातत्याने लढत होतो. हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी मी माझ्या पदरचे पैसे खर्च केले. त्या काळात माझ्यावर प्रचंड ताण होता. पण मला पूर्ण विश्वास होता. त्यामुळे मला हा चित्रपट पूर्ण करायचाच होता," असं अभिषेक म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "ज्यावेळी आम्ही 'केदारनाथ'चं चित्रीकरण करत होतो. त्यावेळी सुशांत कोणत्या अडचणीत वा कशामुळे तरी त्रस्त होता हे मला माहित नव्हतं. पण ज्यावेळी त्याचं निधन झालं तेव्हा सगळं जग त्याचं फॅन झालं. पण तो हयात असताना वेगळं चित्र होतं. एक अशी सिस्टीम होती ज्यामुळे लोकांचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे त्याला कधी समजलंच नाही. त्याला या गोष्टीचा काहीच अंदाज नव्हता आणि त्यातच त्याचं निधन झालं. हे खरंच फार दु:खद आहे."
दरम्यान,अलिकडेच केदारनाथ रिलीज होऊन तीन वर्ष झाली. यावेळी अभिषेकने सुशांतसाठी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्टही लिहिली होती. तसंच सारा अली खाननोदेखील सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला होता. केदारनाथपूर्वी अभिषेकने सुशांतसोबत 'काई पो छे' या चित्रपटात काम केलं होतं.