अजय देवगणच्या नावे लोकांना दोनशे कोटींचा गंडा; सेक्ससीडी प्रकरणातील अभिनेत्रीचा समावेश?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 11:52 AM
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. होय, याठिकाणी अजय देवगणच्या नावाने लोकांची तब्बल दोनशे कोटी ...
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. होय, याठिकाणी अजय देवगणच्या नावाने लोकांची तब्बल दोनशे कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याविषयी पाच लोकांविरोधात सिव्हिल लायन्स पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ज्या लोकांची नावे समोर आली आहेत, त्यामध्ये माजी मिस जम्मू अनारा गुप्ता, ओमप्रकाश यादव, नरेश कुमार, शत्रुघ्न टी सिंग आणि प्रदीप कुमार यांच्या नावांचा समावेश आहे. एसटीएफ अजय सिंगने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, आम्हाला तक्रार प्राप्त झाली की, एम्परर मीडिया अॅण्ड एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड लोकांकडून आॅनलाइन पैसे वसूल करीत आहे. यावेळी लोकांना सांगितले जात होते की, कंपनी अजय देवगणच्या चित्रपटाव्यतिरिक्त भोजपुरी चित्रपटांमध्ये तुमच्या पैशांची गुंतवणूक करणार आहे. सिंगने सांगितले की, चित्रपट यशस्वी झाल्यास तुम्हाला कोट्यवधी रुपयांचा फायदा होणार आहे. याव्यतिरिक्त दर आठवड्याला गुंतवणूकदारांना नफ्याच्या स्वरूपात पैसे दिले जाणार आहेत. ज्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा ही कंपनी ताश्कंद मार्गावरील एका बिल्डिंगमध्ये सुरू करण्यात आली होती. गेल्या शुक्रवारी पोलिसांनी या बिल्डिंगमध्ये छापा टाकून प्रकाश यादव नावाच्या व्यक्तीला अटक केली. यावेळी संशयित आरोपीकडून लॅपटॉप, मोबाइल आदी साहित्य जप्त करण्यात आले. त्याचबरोबर संशयित आरोपींच्या व्हॉट्स अॅपमधून अनारा गुप्तासह इतरांच्याही चॅटचा रेकॉर्ड मिळाला आहे. अनाराविषयी सांगायचे झाल्यास तिने २००१ मध्ये मिस जम्मूचा ताज मिळविला होता. अनारा वयाच्या १६ व्या वर्षी एका सेक्स टेपवरून चर्चेत आली होती. ज्यामुळे तिच्या आई आणि भावांना अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्याचबरोबर तिने दोन वेळा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. पुढे २००५ मध्ये जम्मू आणि काश्मीर येथील न्यायालयाने तिचे हे प्रकरण बंद केले. या प्रकरणामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. त्याचबरोबर तिला लोकप्रियताही मिळाली होती. आता पुन्हा एकदा ती या प्रकरणामुळे लाइमलाइटमध्ये आली आहे.