लॉकडाऊनमुळे हजारोंच्या संख्येतील मजूर वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, अशा अवस्थेत या मजूरांनी शेकडो किमीची पायपीट करत आपल्या मूळ गावाचा रस्ता धरला आहे. सरकार या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे प्रयत्न करतेय. पण या गरीब मजुरांचा धीर आता सुटत चाललाय. कसेही करून लवकरात लवकर त्यांना आपल्या घरी परतायचे आहे. या सगळ्यात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद या मजुरांच्या मदतीसाठी धावला आहे. त्याने या मजूरांसाठी काही दिवसांपासून खास बस सेवा सुरू केली असून तो त्यांना त्यांच्या घरी पोहोचवत आहे. या मजुरांच्या प्रवासाचीच नाही तर त्यांच्या जेवणाची सोयही सोनू करत आहे. त्यामुळे अनेकजण आजही सोनूकडे घरी परतण्यासाठी मदत मागत आहेत.
सोनू सूदकडे सोशल मीडियाद्वारे देखील लोक मदत मागताना दिसत आहेत. नुकतीच सोशल मीडियाद्वारे एकाने सोनूकडे मदत मागितली असून त्याला मदत देण्यास सोनूने होकार देखील दिला आहे. एका व्यक्तीने सोनूकडे मदत मागत ट्वीट केले होते की, मी फॉर्म भरून गोरेगावमधील दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये जमा केला आहे... तसेच उत्तर प्रदेशच्या अॅपवर देखील रजिस्टर केले आहे. पण मला अजून कोणत्याच ठिकाणाहून रिप्लाय आलेला नाहीये. मी बनारसचा राहाणारा असून मला लवकरात लवकर घरी परतायचे आहे. माझी मदत करा असे म्हणत त्या व्यक्तीने त्याचा नंबर देखील दिला आहे.
या व्यक्तीच्या ट्वीटवर सोनूने रिप्लाय दिला की, तुला लवकरच फोन येईन... सामान बांधायला घे.... पण वाराणसीला मी कधी आलो तर मला एक कप चहा नक्कीच पाज...
मजूरांना मदत करण्यायाआधी सोनूने आपले अलिशान हॉटेल देखील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुले केले होते.