Join us

मुघल हे खरे राष्ट्र निर्माते होते...! कबीर खानच्या वक्तव्यावरून नवा वाद; संतापले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 1:01 PM

बजरंगी भाईजान, काबुल एक्स्प्रेस, एक था टायगर असे सुपरहिट सिनेमे देणारा दिग्दर्शक कबीर खान याच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद उभा झाला आहे.

ठळक मुद्दे  मुघलांना कमी लेखणारे चित्रपट आपण सहन करु शकत नाही असं कबीर मुलाखती म्हणाला आहे. 

बजरंगी भाईजान, काबुल एक्स्प्रेस, एक था टायगर असे सुपरहिट सिनेमे देणारा दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) याच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद उभा झाला आहे. चित्रपटांत मुघलांना चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात असल्याचा दावा करत, कबीर खानने याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुघल हेच खरे राष्ट्र निर्माते होते. मात्र त्यांनी लोकांच्या हत्या घडवून आणल्या असं तुम्ही म्हणत असाल तर ते कशाच्या आधारे म्हणताय हे आम्हाला सांगितलं पाहिजे, असे तो म्हणाला. त्याच्या या वक्तव्यानंतर ट्विटरवर जणू ‘युद्ध’ छेडलं गेलंय. कबीर खान जबरदस्त ट्रोल होतोय.बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत कबीर खान बोलला. मुघलांना कमी लेखणारे, त्यांच्याबद्दल चुकीचे संदर्भ देणारे चित्रपट मी सहन करू शकत नाही. मुघल हेच भारत घडवणारे खरे शासक होते, असे तो म्हणाला. ( Kabir Khan calling Mughals  real nation builders )

काय म्हणाला कबीर खान?बॉलिवूडच्या सिनेमात मुघलांना कायम व्हिलन दाखवलं जातं. लोकप्रिय कथानकासाठी हे सारं केलं जातं. पण मला हे  पाहून मला अस्वस्थ व्हायला होतं. माझ्या मते,  तुम्हाला मुघलांना कमी लेखायचं असेल तर त्याआधी थोडं संशोधन करा. संशोधनाच्या आधारावर असं म्हणा आणि मुघल चुकीचे का होते, हे आम्हालाही सांगा.   मुघलांना कायम व्हिलन का दाखवलं जातं हे प्रेक्षकांना समजलं पाहिजे. माझ्या मते, मुघल हे देश घडवणारे खरे शासक होते. मात्र त्यांनी लोकांच्या हत्या घडवून आणल्या असं तुम्ही म्हणत असाल तर ते कशाच्या आधारे म्हणताय हे दाखवलं पाहिजे. नुसतं बोलून मोकळं होणं योग्य नाही. एखादं कथानक लोकप्रिय होईल म्हणून त्यानुसार कथानक रचू नका. भारताच्या इतिहासात वेगवेगळ्या कालावधीत होऊन गेलेल्या मुघल आणि इतर मुस्लीम शासकांना कमी लेखण्याचं काम आज फार सोप्प आहे. मला असं कथानक असणाºया चित्रपटांबद्दल आदर वाटत नाही. अर्थात  हे माझं स्वत:चं वैयक्तिक मत आहे.   मला  अशापद्धतीचं कथानक पाहिल्यावर त्रास होतो. मुघलांना कमी लेखणारे चित्रपट पाहणे हे अडचणीचे तसेच लज्जास्पद वाटते. हिंदी चित्रपटांमध्ये लोकप्रिय कथानकानुसार हे चित्रपट बनवले जातात तसेच ते ऐतिहासिक संदर्भांवर आधारित नसतात, असे कबीर खान म्हणाला.  मुघलांना कमी लेखणारे चित्रपट आपण सहन करु शकत नाही असं कबीर मुलाखती म्हणाला आहे. 

सोशल मीडियावर ट्रोलमुघल खरे राष्ट्रनिर्माते होते, असं म्हणणारा कबीर खान सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतोय. अनेकांनी कबीर खानला लक्ष्य करत, त्याला फैलावर घेतलंय. कबीरच्या वक्तव्यावरच्या नेटकºयांच्या काही कमेंट्स तुम्ही खाली बघू शकता.

टॅग्स :कबीर खानबॉलिवूड