दिग्दर्शक : गुरमीत सिंहकलाकार :सिद्धांत चतुर्वेदी, जॅकी श्रॉफ, ईशान खट्टर आणि कतरिना कैफशैली : कॉमेडीवेळ : 2 तासस्टार : 2.5
बॉलिवूडमध्ये भुताचे चित्रपट काही कमी नाहीत. दर दहा चित्रपटांनंतर एखादा भुताचा कॉमेडी चित्रपट येतोच. प्रेक्षकांना तो हसवून लोटपोट करतो, तर कधी घाबरण्यास भाग पाडतो; पण कतरिना, ईशान आणि सिद्धांत या त्रिकुटाचा ‘फोनभूत’ चित्रपट प्रेक्षकांचं पूर्ण मनोरंजन करतो. हा चित्रपट म्हणजे एंटरटेनमेंट, अॅक्शन, ड्रामा, रोमान्स यांचं एक पॅकेज आहे.
कथानक : ही कहाणी आहे मेजर (सिद्धांत चतुर्वेदी) आणि गुल्लू (ईशान खट्टर) यांची. या दोघांनाही भुतांबद्दल विशेष आकर्षण असतं. ते आयुष्यात कधीतरी असंच काहीतरी भुताटकी करण्याच्या विचारात असतात. दरम्यान, एका पार्टीनंतर त्यांना अचानकपणे आत्मा दिसू लागतात. यानंतर दोघांजवळ रागिणी (कतरिना कैफ) हिचा आत्मा येतो. रागिणीच्या एंट्रीनंतर चित्रपटात सुरू होते ती खरी धम्माल. रागिणी या दोघांसोबत मिळून एक बिझनेस सुरू करते. ज्यामुळे आत्म्यांना मुक्ती मिळते आणि लोकांना त्यांच्यापासून सुटका. मध्यंतरामध्ये फ्लॅशबॅक दाखवण्यात येतो. ज्यात कतरिनाचा मृत्यू कसा झाला आणि ती या दोघांसोबत एकत्र काम का करतेय, हे दाखवण्यात येतं. चित्रपटातील खलनायक म्हणजे अभिनेता जॅकी श्रॉफ. जॅकी दादा यात आत्मारामची व्यक्तिरेखा साकारतो आहे. गुल्लू, मेजर आणि रागिणी हे तिघे मिळून आसारामला हरवू शकतात का? रागिणीची फ्लॅशबॅक स्टोरी काय आहे ? इतरही काही प्रश्न तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन सोडवावे लागतील.
अभिनय : चित्रपट सुरू होतो आणि पुढच्या पाच मिनिटांतच तो हॉरर कॉमेडीचा प्रभाव दिसू लागतो. चित्रपटाला उगीचच लांबवलेलं नाही. काही गमतीदार डायलॉग तुम्हाला नक्कीच हसवतील. चित्रपट इकडे-तिकडे न भरकटता लगेचच कतरिनाच्या एंट्रीसोबत ट्रॅकवर येतो. त्यानंतर ‘गुल्लू स्पेशल’ रेसिपी पडद्यावर बघायला खूप छान वाटते. यातील काही सीन्स तुम्हाला तुमच्या आयुष्यातील वाटतील. चित्रपटात तुम्हाला राका, हीरो थीम, चुचा आणि रजनीकांत हे असे सरप्राइजेस मिळतील.
लेखन व दिग्दर्शन : चित्रपटाच्या बाबतीत लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही बाबी फार महत्त्वाच्या असतात. यात सिद्धांत हा पंजाबी मुंडा तर ईशान हा साऊथ इंडियन मुलगा दाखवण्यात आलेला आहे. ते दोघंही एकमेकांच्या भूमिकेत अगदी फिट बसतात. दुसरीकडे कतरिनाने ठीक काम केल्याचं दिसतं. तिची हिंदी आजही थोडीशी रटाळ वाटते. या तिघांशिवाय चित्रपटात जॅकी श्रॉफ यांनी खूप चांगलं काम केलं आहे.
सकारात्मक बाजू : हॉरर कॉमेडी असल्याने तुम्ही चित्रपट मित्र, परिवारासोबत एन्जॉय करू शकता.
नकारात्मक बाजू : केवळ कतरिनाचे चाहते असाल तर तिचा अभिनय फारसा चांगला नाही.
थोडक्यात : वीकेंडला तुम्ही कॉमेडी चित्रपटाची मजा लुटण्यासाठी म्हणून चित्रपट एन्जॉय करू शकता.