प्रेक्षकांचा आवडता स्टार अजय देवगण (Ajay Devgan) याने 1991 साली बॉलिवूड डेब्यू केला होता. एकाचवेळी दोन धावत्या बाईक्सवर दोन पाय ठेऊन उभं होत एन्ट्री करणारा हा हिरो कोण? म्हणून त्याची तेव्हा जाम चर्चा झाली होती. चेहरा तसा सर्वसामान्य होता. पण प्रेक्षक त्याच्या प्रेमात पडले होते. गेल्या 30 वर्षांत अभिनयाची एकेक शिखरं पादक्रांत करत अजयने प्रेक्षकांची मनं जिंकली. एकाच भूमिकेत अडकून न पडता अगदी अॅॅक्शनपटापासून तर कॉमेडीपर्यंत सर्व प्रकारच्या सिनेमात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पण आजही त्याचा पहिला सिनेमा ‘फूल और कांटे’ (Phool Aur Kaante) प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. त्याचा एन्ट्री सीन तर विसरणं शक्यचं नाही.
‘फूल और कांटे’ हा सिनेमा रिलीज होऊन काल 22 नोव्हेंबरला 31 वर्षे पूर्ण झालीत. सिनेमातील अजयचा एन्ट्री सीन आणि यातले इतर अनेक अॅक्शन सीन्समागे अजयची मेहनत होतीच, पण त्यापेक्षा जास्त त्याचे वडील वीरू देवगण (Veeru Devgan) यांचे कष्ट होते.
आपला पोरगा हिरो होतोय आणि त्याच्या पहिल्या सिनेमात कुठलीही त्रुटी राहायला नको, असं वीरू देवगण यांचं मत होतं आणि म्हणूनच या सिनेमासाठी त्यांनी अपार कष्ट घेतलेत. अजयकडूनही कष्ट करवून घेतले. खरं तर हिरो होण्याचं स्वप्नं अजयने कधीच पाहिलं नव्हतं. ते त्याच्या बाबांचं स्वप्नं होतं. होय, वीरू देवगण यांना हिरो बनायचं होतं. पण ते कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. हे स्वप्न त्यांनी आपल्या मुलाच्या माध्यमातून पूर्ण केलं.
वडिलांनी असं दिलं होतं ट्रेलिंग...अजयला हिरो बनण्याच्या ध्यासानं वीरू देवगण यांना पछाडलं होतं. त्यांनी अजयला कडक ट्रेनिंग दिलं. अगदी सकाळी 6 वाजता उठण्यापासून तर वर्कआऊट, डान्स शिकवण्यापर्यंत. वीरू देवगण आज आपल्यात नाहीत. पण याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, एअरकंडिशनमध्ये झोपणाºया मुलासाठी सकाळी 6 वाजता उठणं कठीण असतं. कारण त्याला सवय नसते. अजयला ही सवय लावण्यासाठीच मलस 4-6 महिने लागलेत. लवकर उठ, जुहू बीचवर जा, म्हणून मी त्याच्यामागे तगादा लावायचो. त्यासाठी स्पेशल जिम बनवली गेली होती. तिथे जाऊन वर्कआऊट कर, डान्स टीचर येणार, त्यांच्याकडून डान्स शिक, जुहू बीचवर जाऊन फाईटर ट्रेनिंग घे, असं सगळं मी त्याला सांगायचो आणि त्याच्याकडून करवून घ्यायचो, असं त्यांनी सांगितलं होतं.
तो वेडेपणा होता...अजय देवगणही आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल बोलला होता. ‘फूल और कांटे’मधील त्या एन्ट्री सीनबद्दलही तो बोलला होता. त्याने सांगितलं होत की, त्या एन्ट्री सीनबद्दल माझ्या मनात नेमक्या काय भावना होत्या, हे मला तसं फारसं आठवत नाही. पण हो, दोन बाईक्सवर उभं राहून एन्ट्री घेणं हा चक्क वेडेपणा होता. हा सीन करताना मी कमालीचा नर्व्हस होतो. माझ्या पोटात गुडगुड सुरू होती. आजही असा काही सीन असला की माझी हीच अवस्था असते. तेव्हा बॉडी डबल नसायचे. अॅक्टरला सर्व सीन स्वत: शूट करावे लागायचे. पण माझ्या वडिलांचा माझ्यावर विश्वास होता. म्हणूनच तो सीन शूट होऊ शकला. माझ्या वडिलांनी ज्या पद्धतीने माझ्याकडून अॅक्शन सीन्स शूट करून घेतले, ते करून मी प्रचंड थकून जायचो. ते ‘फूल और कांटे’ चे अॅक्शन डायरेक्टर होते. त्यांनी माझ्यासाठी कठीण अॅक्शन सीन्स कोरिओग्राफ केले होते. मी ते करू शकेल, हा विश्वास त्यांना होता.’