Join us

राजमौलींचा ‘RRR’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात, वाचा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 1:18 PM

PIL against RRR in Telangana High Court : होय,  राजमौलींच्या या बिग बजेट  चित्रपटाच्या विरोधात तेलंगणामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

‘बाहुबली’ फेम एस. एस. राजमौली ( S S Rajamouli) यांचा ‘आरआरआर’  (RRR) हा सिनेमा आज 7 जानेवारीला रिलीज होणार होता. पण कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आणि ‘आरआरआर’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता काय तर प्रदर्शनाआधीच हा सिनेमा वादात सापडला आहे. होय,  राजमौलींच्या या बिग बजेट  चित्रपटाच्या विरोधात तेलंगणामध्ये जनहित याचिका (PIL against RRR in Telangana High Court) दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत ‘आरआरआर’च्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘टॉलिवूड डॉट नेट’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार,  तेलंगाणामधील पश्चिम गोदावरी येथे राहणाऱ्या एका विद्याथ्याने ही जनहित याचिका दाखल केली आहे. या चित्रपटात इतिहासाशी छेडछाड करण्यात आल्याचा दावा या विद्यार्थ्याने केला असून चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी   केली आहे. 

तुम्हाला ठाऊक आहेच की, या चित्रपटात दोन स्वातंत्र्यवीर अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांची कथा दाखवण्यात आली आहे. याचिकाकर्त्याच्या दाव्यानुसार, चित्रपटात दोन्ही स्वातंत्र्य सेनानींचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. त्यामुळे  सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला सर्टिफिकेट देऊ नये आणि सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी अशी त्याची मागणी आहे.  याप्रकरणी न्यायधीश उज्जवल भूयन आणि वैंकटे्शवर रेड्डी यांनी सुनावणी केली. आता पुढील सुनावणीची प्रतिक्षा आहे.  अद्याप याबाबत दिग्दर्शक राजमौली किंवा त्यांच्या टीमकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांनी इंग्रजांना पळताभुई थोडी केली होती. अल्लूरी यांनी 22 ऑगस्ट 1922 रोजी 300 सशस्त्र सैनिकांसह चिंतापल्ली या पोलिस ठाण्यावर हल्ला चढवत तेथील हत्यारं व दारूगोळा लुटला होता. मलबार येथील रॅम्पा भागातून त्यांनी रॅम्पा मुव्हमेंट नावाने स्वातंत्र्य मोहिम सुरू केली होती. तत्कालीन इंग्रज सरकारने या मोहिमेची इतकी धास्ती घेतली होती की ती संपवण्यासाठी थेट आसाम रायफल्सला पाचारण केलं होतं.

कोमाराम भीम यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी जंगलात राहून असफ जाही यांच्याविरोधात बंड पुकारलं होतं. ‘आरआरआर’या चित्रपटात अभिनेता रामचरण याने अल्लूरी सीताराम राजू यांची भूमिका साकारली आहे. तर ज्युनिअर एनटीआरने कोमाराम भीम यांची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे..

टॅग्स :आरआरआर सिनेमाएस.एस. राजमौलीTollywoodराम चरण तेजा