प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी जोधपूरच्या उमेद भवनात लग्नगाठ बांधली. यानंतर ४ डिसेंबरला दिल्लीत त्यांचे रॉयल रिसेप्शन रंगले. या रिसेप्शनला त्यांच्या कुटुंबियांतील अनेकजण, तसेच त्यांचे मित्रमंडळी उपस्थित होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या रिसेप्शनला उपस्थिती लावली होती. त्यांनी स्टेजवर येऊन या नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आणि एक छानसे गिफ्टदेखील दिले.
नरेंद्र मोदी यांनी प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचसोबत त्या दोघांना भेट म्हणून एक एक गुलाबाचे फूल दिले. खास गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांनी प्रियांका आणि निकला ज्याप्रमाणे गुलाब दिले, त्याचप्रमाणे विराट आणि अनुष्कालादेखील दिले होते.
प्रियांका आणि निकचे दिल्लीतील रिसेप्शन धुमधडाक्यात झाले. प्रियांका आणि निकचा या रिसेप्शनमधील थाट दृष्ट लागावा असाच होता. व्हाईट रंगाच्या लहंगा, त्याला साजेशी ज्वेलरी, केसात माळलेली पांढऱ्या गुलाबाची फुले अशी जणू एखादी राजकन्या भासावी असा प्रियांकाचा थाट होता. नेव्ही ब्ल्यू रंगाचा कोट घातलेला निक जोनास हाही कुण्या राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता.
प्रियांका आणि निकचे अख्खे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमंडळी या रिसेप्शनला हजर होते. गेल्या १ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका आणि निक यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. यानंतर २ डिसेंबरला त्यांनी हिंदू पद्धतीने लग्न केले.
उमेद भवनात त्यांची शाही वरात निघाली होती. यानंतर हिंदू मंत्रोच्चारात दोघांचाही विवाह पार पडला. हा विवाह सोहळा डोळ्यांची पारणे फेडणारा होता. लग्नाचे रिसेप्शनही अगदी असेच डोळ्यांची पारणे फेडणारे होते, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. प्रियांका आणि निकच्या लग्नाचे फोटो लीक होऊ नये म्हणून सुरक्षेचा खास बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ड्रोनने कुणी फोटो घेऊ नये यासाठी खास इस्राईलवरून १२ शूटर्स बोलवण्यात आले होते. प्रियांका व निकच्या लग्नाचे अधिकृत फोटो त्यांनीच त्यांच्या सोशल मीडियाद्वारे फॅन्ससाठी शेअर केले.